विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 06:12 IST2025-09-18T06:10:10+5:302025-09-18T06:12:28+5:30
पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेमध्ये विरार ते डहाणू रोड रेल्वे मार्ग हा एक महत्त्वाचा दुवा आहे. सध्या विरार आणि डहाणू रोड दरम्यान विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड ही स्थानके आहेत.

विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
महेश कोले
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून सुरू आहेत. हा ६४ किमीचा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर विरार- डहाणू दरम्यान वाधिवा, सरतोडी, माकुणसर, चिंटुपाडा, पांचाली, वंजारवाडा आणि बीएसईएस कॉलनी ही नवीन सात स्टेशन उभारण्यात येणार आहेत. परिसराचा वाढत विकास आणि संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही स्टेशन्स तयार उभारण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेमध्ये विरार ते डहाणू रोड रेल्वे मार्ग हा एक महत्त्वाचा दुवा आहे. सध्या विरार आणि डहाणू रोड दरम्यान विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड ही स्थानके आहेत. या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या गर्दीचा आणि भविष्यातील गरजांचा अंदाज घेऊन, एमआरव्हीसीने नवीन स्थानके उभारण्याची तयारी केली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर गरजेनुसार ही स्थानके टप्प्याटप्प्याने विकसित केली जाणार आहेत.
यासाठी आवश्यक आहेत नवीन स्टेशन
विरार-डहाणू विभागात पालघर आणि बोईसर सारखी औद्योगिक शहरे आहेत. या भागात कामगार आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. परंतु या भागात दोन स्थानकांमधील अंतर आणि वेगाने विकसित होणाऱ्या वसाहती पाहता, नवीन स्थानकांची मागणी केली जात आहे. जाणकारांच्या मते भविष्यात स्थानिक सेवांवर ताण वाढेल आणि प्रवाशांचा भार कमी करण्यात नवीन स्थानकांचा विकास महत्त्वाची भूमिका बजावेल. प्रकल्पाची सद्य:स्थिती
सध्या रूळ बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे ४१ टक्के काम झाले आहे.
अशी असतील स्थानके
विरार - वाधिवा- सरतोडी- सफाळे - माकुणसर- केळवे रोड - चिंटुपाडा - पालघर - पांचाली - बोईसर - वंजारवाडा - वानगाव - बीएसईएस कॉलनी - डहाणू रोड
सध्याची प्रवासी संख्या
विरार ५,८१,०००
सफळे ९५,०००
वैतरणा ३०,०००
केळवे ७,०००
पालघर ५७,०००
बोईसर ५१,०००
वाणगाव १,००,०००
डहाणू २,६८,०००