मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 06:28 IST2025-08-21T06:27:57+5:302025-08-21T06:28:38+5:30
प्रवासी वाहतूक सेवेवर परिणाम

मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मोनो मार्गिकेवर गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) १० नव्या गाड्या खरेदी केल्या आहेत. यातील सात गाड्या ताफ्यात येऊनही त्या प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी या मार्गिकेचे संचलन करणाऱ्या महामुंबई मेट्रो संचलन मंडळाला (एमएमएमओसीएल) मुहूर्त मिळाला नाही. गाड्यांअभावी सध्या या मार्गावर १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळाने गाड्या धावत आहेत. परिणामी या गाडीच्या मार्गिकेवर मंगळवारी प्रवाशांची मोठी गर्दी झाली.
मोनो मार्गिका २० किमी लांबीची असून, त्यावर १७ स्थानके आहे. मार्गिकेवर सद्य:स्थितीत केवळ ६ गाड्यांद्वारे सेवा देण्यात येत आहे. त्यातून या मार्गावर मोनो १५ मिनिटांच्या अंतराने धावत आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर एक गाडी दुरुस्तीसाठी सेवेतून काढून टाकावी लागली. परिणामी पाच गाड्या आता धावत आहेत.
एमएमआरडीएने खरेदी केलेल्या सात नव्या गाड्या वडाळा डेपोमध्ये दाखल झाल्या आहेत. यातील पहिली गेल्यावर्षी एप्रिलमध्ये मुंबईत आली होती.
वर्ष उलटूनही त्या गाड्यांच्या चाचण्या सुरू असल्याचे कारण ‘एमएमएमओसीएल’कडून देण्यात येत आहे. त्या प्रवासी सेवेत दाखल करण्यास विलंब होत असल्याने प्रवाशांना गाडीची वाट पाहत थांबावे लागत आहे. त्यामुळेच प्रवासी मोनोचा प्रवास टाळतात. सद्य:स्थितीत या मार्गिकेवर सरासरी १८ हजार ते २० हजार प्रवासी प्रवास करत आहेत.
काही तासांत सेवा पूर्ववत
मोनो मार्गिकेवर मंगळवारी बिघाडामुळे गाडीची काच फोडून प्रवाशांची सुटका करावी लागली. ती दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये दाखल केल्याने मोनोच्या ताफ्यात बुधवारी ५ गाड्याच उरल्या. त्यातील एक गाडी स्टँडबाय ठेवण्यात आली, तर चार गाड्यांवरच मोनोची सेवा सुरू होती. त्यातून दर अर्ध्या तासाने मोनो गाडी चालविली जात होती. प्रवाशांना गाडीसाठी बरीच मोठी प्रतीक्षा करावी लागत होती. पुढील २४ तासांनंतरच ही सेवा पूर्ववत होऊ शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गाड्यांच्या सेन्सर तपासणीसाठी अधिकाऱ्यांची करणार नियुक्ती
मोनोवर मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर गाड्यांतील सेन्सरची तपासणी करण्यासाठी ‘एमएमएमओसीएल’ने दुरुस्ती व देखभाल शाखेच्या संचालकांची नेमणूक केली आहे. आता सर्व गाड्यांचे सेन्सर योग्यरीतीने कार्यरत आहेत की नाही याची तपासणी केली जाणार आहे, असे एमएमआरडीएचे सहमहानगर आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले.
मोनोच्या सात नव्या गाड्या दाखल झाल्या असून, त्यांच्या चाचण्या सुरू आहेत. पुढील काही महिन्यात ती पूर्ण झाल्यानंतर प्रवासी मागणीनुसार या गाड्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत.
-अस्तिक कुमार पांडे, सहमहानगर आयुक्त, एमएमआरडीए