Join us  

‘मेट्रो ६’च्या कारशेडसाठी हवी सात हेक्टर जागा; कंत्राटदाराची नियुक्ती होऊनही जागा ताब्यात नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 10:03 AM

‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेड उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अतिरिक्त ७ हेक्टर जागेची मागणी केली आहे.

मुंबई : स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेड उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अतिरिक्त ७ हेक्टर जागेची मागणी केली आहे. मात्र, अद्याप ही जागा ‘एमएमआरडीए’च्या ताब्यात आली नाही. 

‘एमएमआरडीए’ने ‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडची उभारणी करण्यासाठी सॅम इंडिया बिल्टवेल या कंत्राटदाराची नियुक्ती नुकतीच केली आहे. त्याला ५०८ कोटी रुपयांना हे कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटदाराकडून कांजूरमार्ग येथील जागेवर आगामी काही दिवसांत कारशेड उभारणीच्या  कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल. 

सध्या ‘एमएमएमआरडीए’ला मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा देण्यात आली आहे. मात्र, कारशेडसाठी आणखी ७ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. ‘एमएमआरडीए’ने या अतिरिक्त जागेची मागणी राज्य सरकारकडे यापूर्वीच केली आहे. मात्र, कंत्राटदाराची नियुक्ती झाली तरी अद्याप ही जागा ‘एमएमआरडीए’च्या ताब्यात आली नाही. 

१३ गाड्या उभ्या करणार-

यापूर्वी ९ गाड्या एकावेळी उभ्या राहू शकतील, यादृष्टीने ‘एमएमआरडीए’ने कारशेडच्या उभारणीचे नियोजन केले होते. 

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या मार्गिकेसाठी अतिरिक्त स्टाबलिंग यार्डची गरज पडणार आहे. या मेट्रो मार्गिकेसाठी २०३१ मध्ये एकूण १३ गाड्या एकाच वेळी उभ्या राहू शकतील यादृष्टीने कारशेड उभारणी करावी लागणार आहे. मेट्रो कारशेडसाठी अन्य सुविधा निर्माण करण्यासाठी जागेची आवश्यकता भासणार आहे. त्यादृष्टीने ‘एमएमआरडीए’ने या अतिरिक्त जागेची मागणी केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

अडीच वर्षांत मार्गिका उभारण्याचे नियोजन-

मेट्रो ६ मार्गिकेची लांबी १५.३१ किमी असून त्यावर १३ स्थानके असतील. ‘जेव्हीएलआर’वरून पवई येथून ही मेट्रो मार्गिका पुढे जाणार आहे. या मार्गिकेमुळे ओशिवारा ते कांजूरमार्ग हा प्रवास जलद होणार आहे. तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरे एकमेकांना जोडली जातील. त्यातून या भागातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मदत मिळणार असून त्यांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागणार नाही.  पुढील अडीच वर्षांत ही मार्गिका उभारण्याचे नियोजन ‘एमएमआरडीए’ने केले आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रोएमएमआरडीए