Join us  

'शेठ'... संजय राऊतांची नवी शायरी, अभिनेता राजकुमारचा अंदाज-ए-बया...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 10:22 AM

महाराष्ट्रात मात्र दिल्लीवाले ‘फडणवीस एके फडणवीस’ करीत आहेत यामागचे रहस्य नेमके काय ते समजून घ्यावे लागेल,

मुंबई - मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चुका केल्या त्या निदान विरोधी पक्षनेते म्हणून तरी करू नयेत. विरोधी पक्षनेतेपदाची शान व प्रतिष्ठा राहावी अशी आमची इच्छा आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. खरं तर भाजपाचा हा अंतर्गत मामला आहे की, कुणाला विरोधी पक्षनेता करायचे किंवा कुणाला आणखी काय करायचे, पण राजस्थानात भाजपाचे सरकार आले नाही. तेथे माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे या काही विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्चीवर बसल्या नाहीत. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या भाजपा सरकारचा पराभव झाला. तेथेही बलाढय़ मानले गेलेले शिवराजसिंह चौहान हे विरोधी पक्षनेते बनले नाहीत व पक्षाच्या अन्य नेत्यांनी ते पद स्वीकारले. 

महाराष्ट्रात मात्र दिल्लीवाले ‘फडणवीस एके फडणवीस’ करीत आहेत यामागचे रहस्य नेमके काय ते समजून घ्यावे लागेल, अशा शब्दात शिवसेनेने सामना अग्रलेखातून फडणवीसांना टोला लगावला आहे. तसेच, दिल्लीकरांच्या भूमिकेबाबतही मनात शंका उपस्थित केली आहे. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडताना, शायरीच्या माध्यमातून भाजपावर सातत्याने निशाणा साधला आहे. शरो-शायरीच्या माध्यमातून सुरु असलेली ही टोलेबाजी अद्यापही सुरुच आहे. राऊत यांनी आज पुन्हा शायरीतून भाजपला लक्ष्य केलं. पण, आज शेठ, असा शब्द वापरून मोदींना लक्ष्य केलंय.     

राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटसह सामनाच्या अग्रलेखातूनही भाजपावर बाण चालवले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात बंड करून खासदारकीचा राजीनामा देणारे पहिले भाजपा क्रांतिवीर म्हणून नाना पटोले यांची नोंद आहे. विधानसभेत ते जिंकले व आता विधानसभेचे अध्यक्ष झाले. मोदी कुणाला बोलू देत नाहीत असे पटोले यांचे सांगणे होते. आता विधानसभेत फडणवीस यांनी बोलायचे की नाही हे नाना पटोले ठरवतील. विरोधी पक्षनेत्याने स्वतःची व पदाची प्रतिष्ठा राखली तर सर्व ठीक घडेल. आम्ही संसदीय लोकशाहीचा आदर करतो, तुम्हीही करा. हे सरकार पाच वर्षे टिकेल. हे सरकार कायदेशीर मार्गाने सत्तेवर आले आहे. 170 चा आकडा कायम राहील. विरोधी पक्षाने याचे भान ठेवावे, त्यातच त्यांचे हित आहे असा अप्रत्यक्ष इशाराही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सामनातून देण्यात आला आहे.  

टॅग्स :मुंबईसंजय राऊतशिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीस