Sessions court acquits 19 in Kandahar hijacking case | कंदहार विमान अपहरणप्रकरणी सत्र न्यायालयाकडून १९ जणांची सुटका

कंदहार विमान अपहरणप्रकरणी सत्र न्यायालयाकडून १९ जणांची सुटका

मुंबई : कंदहार विमान अपहरण प्रकरणी अब्दुल लतीफ अदम मोमीनसह १८ जणांची सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने योग्य ठरविला. त्यामध्ये पासपोर्ट विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  
अपहरणकर्त्यांना बनावट पासपोर्ट मिळवण्यासाठी मदत व्हावी, यासाठी कागदपत्रे पुरविल्याचा आरोप या सर्वांवर होता. डिसेंबर १९९९ मध्ये आयसी-८१४ विमानाचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणात प्रमुख भूमिका असलेला मुंबईचा रहिवासी मोमीन पंजाब येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. विमान अपहरण करण्याचा कट तडीला नेण्यासाठी सर्व आरोपींनी मोमीनद्वारे अपहरणकर्त्यांना मदत केल्याचा आरोप पोलिसांनी केला. पासपोर्ट केसमध्ये आरोपी असलेल्या १९ जणांची सुटका २०१२ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने केली. या निर्णयाला सरकारने सत्र न्यायालयात आव्हान दिले. 
अपिलात सरकारने म्हटले आहे की, मोमीनच्या पासपोर्ट एजंटलाही या प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. कोणतीही वैध कागदपत्रे नसताना २५०० रुपयांची लाच स्वीकारून पासपोर्ट बनवून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक करणे, एकाच उद्देशाने एकत्र येणे आणि पासपोर्ट कायद्यांतर्गत या सर्वांवर गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपींकडून अनेक गोष्टी हस्तगत करण्यात आल्या.
कनिष्ठ न्यायालयाने निकालात म्हटले की, अपहरणकर्ते आणि आरोपींचे संबंध असल्याचे सिद्ध करण्यात सरकारी वकील अपयशी ठरले आहेत. या आरोपींमध्ये पासपोर्ट विभागाचे अधिकारी, पोस्टमन, मोटार ट्रेनिंग स्कूल कर्मचारी, पासपोर्ट एजंट यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात २८ जणांचा जबाब नोंदविण्यात आला. मात्र, त्यांच्या साक्षीवरून या सर्वांचे धागेदोरे अपरहरणकर्त्यांशी जुळत नाहीत. २४ डिसेंबर १९९९ रोजी पाच जणांनी एअर इंडियाच्या एका विमानाचे अपहरण केले. या विमानात १८९ प्रवासी होते. विमान अपहरणानंतर ते कंदहार येथे उतरवून अतिरेक्यांनी भारत सरकारपुढे काही मागण्या ठेवल्या. सरकारने अटक केलेल्या मसूद अझहर या अतिरेक्याला सोडण्याची मागणीही करण्यात आली होती. या अपहरणकर्त्यांनी २५ वर्षीय एका मुलाची हत्या केली होती. अपहरणकर्त्यांना पासपोर्ट बनवण्यास मदत केल्याप्रकरणी २३ जणांना आरोपी करण्यात आले होते. त्यापैकी काहींची आरोपमुक्तता करण्यात आली तर काहींचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sessions court acquits 19 in Kandahar hijacking case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.