ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 01:20 PM2021-06-01T13:20:21+5:302021-06-01T13:20:52+5:30

मराठी पत्रकारितेत सुमारे पाच तप कार्यरत राहिलेल्या राधाकृष्ण नार्वेकर यांचे आज निधन झाले.

Senior journalist Radhakrishna Narvekar passes away | ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन

googlenewsNext

मुंबई- 'मुंबई सकाळ' चे माजी संपादक,  ज्येष्ठ पत्रकार श्री. राधाकृष्ण नार्वेकर यांचे आज सकाळी 7.58 मिनिटांनी विलेपार्ले पश्चिम येथील कूपर हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. ते 82 वर्षाचे होते.  कोरोनावर मात करून गेल्याच आठवड्यात ते सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधून घरी परतले होते. काल रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना  कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नी क्षमा नार्वेकर यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली,जावई आणि खूप मोठा  आप्तपरिवार आहे. 

मराठीपत्रकारितेत सुमारे पाच तप कार्यरत राहिलेल्या राधाकृष्ण नार्वेकर यांनी दैनिक `नवाकाळ'चे बातमीदार , दैनिक `सकाळ' चे संपादक , दैनिक `पुण्यनगरी' वृत्तपत्र समूहाचे सल्लागार संपादक ही सर्व महत्त्वाची जबाबदारीची पदे भूषविली आहेत.  मुंबईतील दैनिक `सकाळ'च्या संपादक पदावरुन निवृत्त झाल्यावर नार्वेकर यांनी लिहिलेले `सेवानिवृत्त झालात,  आता पुढे काय?’ हे पुस्तक लोकप्रिय ठरले. उर्दू भाषेत त्याचे भाषांतर झाले तसेच साहित्य अकादमीचा पुरस्कारही लाभला होता . हिंदी व इंग्रजी भाषेतही त्याचे भाषांतर झाले आहे. त्यांनी लिहिलेले ‘मनातली माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मुंबईतील अनेक नामवंत  पत्रकार आणि संपादक  घडविण्यासाठी नार्वेकर यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे.    
  
 कोकणातील आरोंदा या गावातून मुंबईत आलेल्या नार्वेकर यांनी आपली कोकणची बांधिलकी अखेरपर्यंत जपली.  माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळावे, गिरणी कामगारांना न्याय मिळावा,  नवी मुंबई मधील प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. वसई–विरार, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, शहापूर या शहरांच्या विकासाकरिता मुंबई सकाळच्या माध्यमातून विशेष पुरवण्या प्रकाशित करून या शहरांच्या विकासातील आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यांच्या   या उपक्रमांची शासनाने देखील दखल घेतली आहे. या पुरवण्या निश्चितच मार्गदर्शक व संग्राह्य ठरल्या आहेत. दूरदर्शनचा सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कारासह अनेक महत्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले नार्वेकर संपादक या नात्याने अमेरिका, जपान, रशिया, इस्राएल, बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा  विविध देशात  महत्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. लोणावळा येथील
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दि. गो. तेंडुलकर स्मृती मंदिर उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना, त्यांच्याच पुढाकाराने निसर्गरम्य परिसरातील पत्रकार संघाची ही वास्तू उभी राहिली आहे. 

 मुंबई मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून काम केलेल्या राधाकृष्ण नार्वेकर यांनी पत्रकार हिताच्या अनेक योजना राबवल्या होत्या . मुंबईतील मराठा हायस्कूलमध्ये  शिक्षक म्हणून काम केल्यानंतर   पत्रकारितेचा मार्ग स्वीकारून समाज हितासाठी झटणारे आणि अनेकांना तसं  झटण्याची, लोकाभिमुख पत्रकारितेची प्रेरणा देणारे नार्वेकर म्हणजे पत्रकारितेचे विद्यापीठ होते, त्यांच्या जाण्याने मराठी पत्रकारितेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  

कोविड नियमानुसार  नार्वेकर यांच्यावर मुलगी जयश्री, शिल्पा आणि जावई बिमल पारिख या निकटवर्तीयांच्या उपस्थितीत  आज सकाळी अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, असे  नार्वेकर यांचे कौटुंबिक स्नेही  शिवाजी धुरी यांनी कळवले आहे.

Web Title: Senior journalist Radhakrishna Narvekar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.