IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:56 IST2025-04-30T12:28:30+5:302025-04-30T12:56:43+5:30

वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Senior IPS officer Deven Bharti has been appointed as the new Commissioner of Mumbai Police | IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व

IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व

Mumbai CP Deven Bharti: वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले आहेत. १९८९ तुकडीचे अधिकारी असलेल्या फणसळकर यांच्यानंतर मुंबईचे पुढील पोलीस आयुक्त कोण, याची चर्चा सुरू होती. त्यानंतर गृह विभागाने देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, अर्चना त्यागी या वरिष्ठ अधिकारी यांच्या नावांची चर्चा असतानाच देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस दलाची सुत्रे सोपवण्यात आली आहेत. भारती यांच्याकडे दोन वर्षांपासून मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त हे पद देखील आहे.

देवेन भारती हे मुंबईचे सर्वात जास्त काळ सह पोलिस आयुक्तपदी (कायदा आणि सुव्यवस्था) आहेत. देवेन भारती हे महाराष्ट्रातील एक गतिमान पोलीस अधिकारी म्हणून गणले जातात. एवढेच नाही तर भारती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे मानले जातात. त्यानतंर आता मुख्यमंत्र्यांनी भारतींवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. देवेन भारती यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह आणि पत्रकार जे डे यांच्या हत्येसह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. महाराष्ट्रात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्याचे कामही त्यांनी केले.

कोण आहेत देवेन भारती?

देवेन भारती हे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते मुंबई पोलिस दलात सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. मात्र, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर देवेन भारती यांची वाहतूक विभागात सहआयुक्तपदी नियुक्ती केली गेली. बदलीच्या सव्वा महिन्यानंतर त्यांची अप्पर पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलिस आयुक्तपद निर्माण करण्यात आले त्यावर देवेन भारतींची नियुक्ती करण्यात आली. भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.

दोन वर्षांपूर्वी झाली होती ऐतिहासिक नियुक्ती

दोन वर्षापूर्वी दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर देवेन भारती हे या मुंबई पोलीस दलातील विशेष पोलीस आयुक्तपदावर बसणारे पहिले आयपीएस अधिकारी ठरले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या पदासाठी वेगळ्या कॅडरची निर्मिती करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील संचालक, सुरक्षा आणि अंमलबजावणी या अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या पदाचं नाव बदलण्यात आलं आहे.

Web Title: Senior IPS officer Deven Bharti has been appointed as the new Commissioner of Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.