'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:57 IST2025-11-03T13:51:37+5:302025-11-03T13:57:14+5:30
मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाच्या बार रूममध्ये एका जेष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
Esplanade Court:मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील एस्प्लेनेड कोर्टाच्या बार रूममध्ये गेल्या आठवड्यात एक अत्यंत दुःखद घटना घडली. ठाण्याच्या माजीवडा येथे राहणाऱ्या आणि मुंबई उच्च न्यायालय तसेच कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थ म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या ज्येष्ठ वकील मालती रमेश पवार (५९) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, कोर्ट परिसरात डॉक्टर आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तसेच उपस्थितांनी वेळेवर मदत न केल्यामुळे त्यांचा जीव गेल्याचा गंभीर आरोप त्यांचे पती रमेश पवार यांनी केला आहे.
मृत वकील मालती पवार यांचे पती रमेश पवार यांनी घटनेची संपूर्ण माहिती दिली. "माझी पत्नी शुक्रवारी एका केसच्या कामासाठी कोर्टात गेली होती. दुपारी अस्वस्थ वाटत असल्याने ती बार रूममध्ये आराम करत होती. तिथेच तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तिथे अनेक वकील उपस्थित असूनही एकालाही वकिलाला सीपीआर कसे द्यायचे, याचे ज्ञान नव्हते. कोर्टाच्या अगदी शेजारीच जी.टी. रुग्णालय असतानाही, तिथल्या लोकांनी तिला तत्काळ रुग्णालयात नेण्याची तसदी घेतली नाही, असा आरोप रमेश पवार यांनी केला.
मदत करण्याऐवजी काही लोक बेशुद्ध असलेल्या मालती पवार यांना पाणी किंवा चहा देण्याचा प्रयत्न करत होते. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे कोणीतरी हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करत होतं असाही आरोप रमेश पवार यांनी केला.
मिड-डेच्या वृत्तानुसार, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आझाद मैदान पोलिसांनी रमेश पवार यांना कॉल करून पत्नीला कामा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. "मी रुग्णालयात पोहोचलो, तेव्हा माझी पत्नी स्ट्रेचरवर एकटीच पडलेली होती, तिच्या बाजूला तिची बॅग होती. सोबत एकही सहकारी नव्हता. मी माझी पत्नी गमावली आहे, पण दुसऱ्या कुठल्या वकिलावर अशी वेळ नये. कोर्टात अनेक ज्येष्ठ वकील काम करतात. तातडीने डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याची नितांत गरज आहे."
या घटनेनंतर, वकील सुनील पांडे यांनी एस्प्लेनेड कोर्टाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना पत्र लिहून सर्व मुंबई कोर्टांमध्ये तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यामध्ये वकिलांसाठी सीपीआर प्रशिक्षण, आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि जीटी व कामा रुग्णालयांसारख्या सरकारी रुग्णालयांशी जलद संपर्क साधण्यासाठी विशेष 'इमर्जन्सी रिस्पॉन्स मेकॅनिझम' तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे.