Senior Congress leader Harshavardhan Patil joins BJP | काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश
काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

मुंबईः काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित आहेत. पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक बुरूज ढासळला असून, आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

इंदापूर विधानसभा मतदार संघांचे पाटील यांनी सलग 4 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम देखील पाटील यांच्या नावावर आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात 5 वर्षे व त्यानंतर आघाडी शासनात सलग 14 वर्षे मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे.

पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने आजपर्यंत इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांच्यातला सुप्त संघर्ष आता उघड उघड पाहायला मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी केली होती. या बदल्यात राष्ट्रवादीने इंदापूरची जागा काँग्रेसला सोडावी असे ठरले होते. त्यानुसार हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना मदत केली. यामुळे त्यांना सर्वाधिक मताधिक्य तालुक्यातून मिळाले. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजताच राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडण्याच्या मनस्थितीत नव्हती. यामुळे हर्षवर्धन पाटील यांची अस्वस्थता वाढली होती.

Web Title: Senior Congress leader Harshavardhan Patil joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.