८५ वर्षांवरील ज्येष्ठांना गृहमतदानाची सुविधा नाही; पालिका निवडणुकीसाठी तरतूद नसल्याचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:12 IST2025-12-20T12:11:21+5:302025-12-20T12:12:01+5:30
लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत नियमांत तरतूद असल्याने दोन्ही निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदान करता आले होते.

८५ वर्षांवरील ज्येष्ठांना गृहमतदानाची सुविधा नाही; पालिका निवडणुकीसाठी तरतूद नसल्याचा फटका
मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत नियमांत तरतूद असल्याने दोन्ही निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदान करता आले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तशी तरतूद नसल्याने आता त्यांना घरून मतदान करता येणार नाही.
मतदान केंद्रावरच त्यांना जावे लागेल. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत याबाबत विशेष सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित संघटनांनी केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा. ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी बऱ्याच सुविधा देण्यात आल्या होत्या. मतदानाचा टक्का वाढावा , यासाठी लोकसभा, विधानसभेला घरी मतदानाची सुविधा दिली होती.
सवलतींसाठी साकडे
आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गैरसोय होऊ नये म्हणून ज्येष्ठांना मतदान करताना विशेष सवलती द्याव्यात, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांच्या जॉइंट अॅक्शन कमिटीचे सभासद प्रकाश बोरगांवकर, अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर, प्रा. नसरीन, विजय औंधे, शैलेश मिश्रा यांनी नुकतीच राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन केली. निवडणुकीत ज्येष्ठांना विशेष सवलती देण्याबद्दलचे विनंती पत्र दिले.
यासंदर्भात प्रकाश बोरगांवकर म्हणाले, बऱ्याच ज्येष्ठ व्यक्तींना चालण्याचा त्रास होतो. त्यामुळे त्यांना मतदान केंद्रापर्यंत वाहनाने नेण्याची परवानगी द्यावी. त्यावर वाघमारे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊ, असे आश्वासनही दिले.
"८५ वर्षांवरील नागरिकांच्या घरी मतदानासाठी कर्मचाऱ्यांनी जाण्याची तरतूद दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. त्यानुसार त्यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी घरून मतदान करता आले. मात्र तशी तरतूद या निवडणुकीत नाही. त्यामुळे तसे काही करता येणार नाही. पण मतदान केंद्रांवर सर्व सुविधा असतील. यात व्हील चेअर, रॅम्प अशा सेवा असतील. या सेवांना प्राधान्य दिले जाईल. पण घरून मतदान करता येणार नाही." - दिनेश वाघमारे, आयुक्त, राज्य निवडणूक