Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा, त्या विधानावरुन आता शिवसेनाही आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 18:40 IST

राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने काळातील आदर्श आहेत, असे विधान केले होते. त्यावरुन, आता राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. त्यातच, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन संताप व्यक्त होत असून शिवसेनेच्या ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतं. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने काळातील आदर्श आहेत, असे विधान केले होते. त्यावरुन, आता राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून, या राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती करतो, असे खडे बोल संभाजीराजेंनी सुनावले आहेत. त्यानंतर, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेही आक्रमक झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरुन, महाराष्ट्रात शिवप्रेमी संघटना आणि शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना ठाकरे गटही आक्रमक झाला असून ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी राज्यपालांची महाराष्ट्राबाहेर हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. 

राज्यपाल ज्यांना नवीन आदर्श किंवा हिरो मानत आहेत, ते हिरो स्वत: आपलं भाषण सुरू करण्यापूर्वी शिवाजी महाराजांचं नाव घेतात. कारण, शिवाजी महाराज हे व्यक्ती नसून आमचा प्राण आहे, असे आनंद दुबे यांनी म्हटलं. तसेच, राज्यपालांची महाराष्ट्राला काहीही गरज नाही. त्यामुळे, त्यांना महाराष्ट्रातून हटवा, अशी मागणीही दुबे यांनी केली आहे. 

काय म्हणाले होते राज्यपाल

आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावरून संभाजीराजेंनी तीव्र शब्दांत भाष्य केले आहे.

राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा, छत्रपती संतापले

राज्यपाल असे का बडतात मला माहिती नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या असं मी परवा सुद्धा म्हटलं होते. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील, संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? महाराष्ट्राचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसे शकते. यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसे? अशी संतप्त विचारणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. 

टॅग्स :भगत सिंह कोश्यारीछत्रपती शिवाजी महाराजशिवसेनाउद्धव ठाकरे