Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:वर गोळी झाडून जवानाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 07:51 IST

मूळचे पंजाबचे रहिवासी असलेले केसर सिंग (५६) हे आॅक्टोबर महिन्यापासून नौदलाच्या ट्रॉम्बे येथील कॅम्पमध्ये वॉच टॉवर सुरक्षारक्षक म्हणून तैनात होते.

मुंबई : नौदलाच्या ट्रॉम्बे येथील कॅम्पमध्ये तैनात असलेल्या सैन्य सुरक्षा दलाच्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. कामाच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारपासून ते १५ दिवसांच्या रजेवर जाणार होते. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मूळचे पंजाबचे रहिवासी असलेले केसर सिंग (५६) हे आॅक्टोबर महिन्यापासून नौदलाच्या ट्रॉम्बे येथील कॅम्पमध्ये वॉच टॉवर सुरक्षारक्षक म्हणून तैनात होते. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कार्यरत होते. सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास त्यांनी बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीच्या आवाजाने अन्य सहकाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित केले. पोलिसांना सुसाइड नोट मिळालेली नाही. शुक्रवारपासून ते १५ दिवसांच्या रजेवर जाणार होते. त्यापूर्वीच त्यांनी हे पाऊल का आणि कशासाठी उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत. ट्रॉम्बे पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. कामावर आल्यापासून घडलेल्या घडामोडी तसेच त्यांना काही त्रास होता का, याबाबत त्यांच्या सहकाºयांकडेही चौकशी सुरू आहे. अद्याप नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश साळवी यांनी सांगितले.

टॅग्स :सैनिक