Join us  

बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलीची अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 9:31 AM

Student News : बेस्ट कर्मचारी वसाहत परळ येथे राहणारी आणि  बेस्ट कर्मचारी यांची मुलगी आलिया अब्दुल रजाक मुल्ला हिची सिंगापूरनंतर आता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या व्हीटॉन युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली आहे. 

-  मनोहर कुंभेजकरमुंबई : बेस्ट कर्मचारी वसाहत परळ येथे राहणारी आणि  बेस्ट कर्मचारी यांची मुलगी आलिया अब्दुल रजाक मुल्ला हिची सिंगापूरनंतर आता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या व्हीटॉन युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली आहे. बेस्टचे कर्मचारी, वाहनचालक पदावर कार्य करणारे अब्दुल रजाक मुल्ला यांची मुलगी आलिया हिने अभ्युदयनगर मुंबई पब्लिक स्कूलमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिची सिंगापूर येथे २०१८ ते २०२० पर्यंत पुढील शिक्षणासाठी निवड झाली होती. आलियाचे वडील अब्दुल मुल्ला यांची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तिने ही कामगिरी बजावली आहे. अकरावी-बारावीसाठी तिची युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साऊथ ईस्ट एशिया या आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी निवड झाली. या ठिकाणी दोन वर्षे शिक्षण घेत गुणवत्ता सिद्ध केल्याने आलियाची निवड पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या व्हीटॉन युनिव्हर्सिटीमध्ये झाली आहे. या ठिकाणी ती पुढील चार वर्षे लिबरल आर्ट्स डिग्री, स्पेशलायझेशन इन सिलेक्टेड सब्जेक्टचे शिक्षण घेणार आहे.पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अद्ययावत शिक्षण दिले जाते. मात्र यासाठी स्वतःही मेहनत घेणे आवश्यक असते. मीही यामुळेच यशस्वी झाले आहे. पालिका शाळेतील विद्यार्थीही परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल यश मिळवू शकतात, असे मनोगत आलिया मुल्ला हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे केवळ मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आलियाने जे यश मिळवले आहे त्याचा पालक म्हणून आम्हाला अभिमान आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी घेण्याबाबत आलियाचा प्रवास प्रेरणादायी राहील.आलियाचे आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुकदरम्यान, आलिया मुल्ला हिने मिळविलेल्या यशाबद्दल राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी तिचे कौतुक केले आहे. आलिया हिची जिद्द आणि पालिका शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या मेहनतीमुळेच असे यश मिळत असल्याचे त्यांनी  ट्विटमध्ये म्हटले आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षण समितीकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे आदित्य यांनी  सांगितले. शिवसेनेकडून सत्कार !आलिया मुल्ला हिची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या व्हीटॉन युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्यावतीने तिच्या घरी जाऊन गौरव करण्यात आला. शिवडी विधानसभा व शाखा क्रमांक २०४च्या वतीने पुढील ४ वर्षांच्या शिक्षणाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विभागप्रमुख व आमदार अजय चौधरी, नगरसेवक अनिल कोकीळ, एकनाथ सणस, राजू रावराणे, पाटणकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :शिक्षणबेस्टमुंबई