समुद्राची 'सटकली'; मुंबईचा कचरा मुंबईला परत, उद्या उसळणार मोठ्या लाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 18:44 IST2018-07-14T18:03:51+5:302018-07-14T18:44:33+5:30
मुंबापुरीच्या मरीन ड्राईव्ह बीचवरील समुद्रकिनारी लाटांमधून तब्बल 9 मॅट्रिक टन कचरा जमा झाल्याचे पाहायला मिळाले.

समुद्राची 'सटकली'; मुंबईचा कचरा मुंबईला परत, उद्या उसळणार मोठ्या लाटा
मुंबई - मुंबापुरीच्या मरीन ड्राईव्ह बीचवरील समुद्रकिनारी लाटांमधून तब्बल 9 मॅट्रिक टन कचरा जमा झाल्याचे पाहायला मिळाले. महापालिकेच्या ए आणि सी वॉर्डातील कर्मचाऱ्यांनी समुद्रकिनारी एक किलोमीटर परिसरात पसरलेला हा संपूर्ण कचरा अवघ्या तासाभरात उचलला. त्यासाठी 30 कामगार कामाला लागले होते. समुद्राने बाहेर फेकलेल्या या कचऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर रविवारीही समुद्राकिनारी मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
सरकारने प्लॅस्टीक बंदीचा निर्णय घेतला. पण, समुद्रात प्लॅस्टीक टाकण्यास कुठलीही बंदी नाही. त्यामुळेच बेशिस्त मुंबईकरांकडून समुद्रात टाकण्यात आलेला कचरा समुद्राने आपल्या लाटांसह बाहेर फेकला आहे. मुंबईकरांच्या बेशिस्त आणि अस्वच्छतेलाच समुद्राने लाटांवर स्वार केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शुक्रवारी मुंबईकरांना हाच कचरा समुद्राकडून व्याजासह परत करण्यात आला. समुद्राने साभार परत केलेल्या या भेटीचा मुंबईकरांनी विचार करावा आणि पुन्हा अशाप्रकारे कचरा समुद्रात फेकू नये, कदाचित असेच समुद्राला सुचवायचे असेल. दरम्यान, मुंबईच्या समुद्रात रविवारी पावणे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्हवर रविवारचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या मुंबईकरांनी सावधानता बाळगावी, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
पाहा व्हिडिओ -