मुंबई विमानतळावरून सुकविलेले समुद्री घोडे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 23:14 IST2019-03-08T23:13:59+5:302019-03-08T23:14:07+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री सुकविलेल्या समुद्री घोड्यांची बॅग कांदळवन विभागाने जप्त केली.

मुंबई विमानतळावरून सुकविलेले समुद्री घोडे जप्त
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री सुकविलेल्या समुद्री घोड्यांची बॅग कांदळवन विभागाने जप्त केली. एक आरोपी मलेशियाला तीन किलो समुद्री घोडे घेऊन जात असताना त्याला अटक करण्यात आली. मुंबई कांदळवन संधारण घटकातर्फे कारवाई करण्यात आली असून, आरोपीला सात दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुकविलेल्या समुद्री घोड्यांचे सूप प्यायल्याने लैंगिक शक्ती वाढते, अशी धारणा सिंगापूर, चीन, जपान या देशांमध्ये असल्याने देशातून समुद्री घोड्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती वन्यजीव तस्करीचे अभ्यासक विजय अवसरे यांनी दिली. शार्क माशांच्या विविध अवयवांची तस्करी ही परदेशात सूप, सौंदर्य प्रसाधने, तेल, कपडे बनविण्यासाठी होते. घरामध्ये समुद्री प्रवाळ लावल्याने कुटुंबाची प्रगती होते, अशा अंधश्रद्धेपोटी सागरी जिवांसह, वनस्पतींची तस्करी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
समुद्री घोड्यांची तस्करी केल्यावर शेड्युल वननुसार वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कारवाई केली जाते. कांदळवन विभागाने आरोपीचे नाव गुप्त ठेवले आहे. कारण समुद्री घोड्यांच्या तस्करीचे धागेदोरे चेन्नई आणि बंगळूरूपर्यंत पसरलेले आहे. त्यामुळे कांदळवन विभागाने हे प्रकरण लावून धरून खोलापर्यंत तपास सुरू आहे, अशी माहिती कांदळवन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
>आरोपीला पुढील तपासासाठी चेन्नईला घेऊन जात आहोत. आरोपीचे नाव गुरुवारी प्रसिद्ध केले जाईल. आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी त्याला घेऊन जाऊन पुढील तपास सुरू केला जाईल.
- मकरंद घोडके, सहायक वनसंरक्षक, कांदळवन क्षेत्र