Join us

सुरक्षारक्षकांना १३ महिने ओव्हर टाइम भत्ताच नाही! काहींची थकबाकी लाखो रुपयांच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:13 IST

Mumbai News: मुंबईच्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पालिकेच्या मुख्यालयातील सुरक्षारक्षकांना ‘ओव्हर टाइम’चा भत्ता अजूनही मिळालेला नाही. यातील काही सुरक्षारक्षकांची ही थकबाकी हजारांपासून लाखांपर्यंत पोचलेली आहे.

मुंबई  - मुंबईच्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पालिकेच्या मुख्यालयातील सुरक्षारक्षकांना ‘ओव्हर टाइम’चा भत्ता अजूनही मिळालेला नाही. यातील काही सुरक्षारक्षकांची ही थकबाकी हजारांपासून लाखांपर्यंत पोचलेली आहे. वित्त विभाग आणि लेखापालांकडे याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही हा प्रश्न न सुटल्याने आता या कर्मचाऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे.

पालिकेकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांवर मोठा खर्च केला जातो. मात्र, मुख्यालयाच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना ओव्हर टाइम भत्ता मिळवण्यासाठी मात्र खेपा माराव्या लागत आहेत. मुख्यालयातील आठपैकी चार प्रवेशद्वारांतून इमारतीत प्रवेश दिला जातो. येथे प्रत्येकी २-३ सुरक्षारक्षक तीन पाळ्यांमध्ये तैनात असतात. यापूर्वी ९७ सुरक्षारक्षक होते. मात्र, यातील काहींना लिपिक म्हणून बढती मिळाल्याने आणि काही निवृत्त झाल्याने ही संख्या आता खूप कमी झाली. या कारणास्तव आता जवळपास ४५ टक्के पदे रिक्त असून त्यामुळे अनेकांना ओव्हर टाइम करावा लागतो. मात्र, जानेवारी २०२३ पासून ओव्हर टाइम भत्ता या सुरक्षारक्षकांना मिळालेला नाही.  याबाबत त्यांना फक्त आश्वासनच दिले जात आहे. 

काहींना लिपिक म्हणून मिळाली बढतीमुख्यालयात यापूर्वी सुरक्षा रक्षकांची संख्या ९७ होती. मात्र, यातील काहींना लिपिक म्हणून बढती मिळाल्याने आणि काही निवृत्त झाल्याने ही संख्या आता खूप कमी झाली. सध्या सेवेत असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.  

उशीर झाल्यास पगारात कपातबायोमेट्रिक हजेरीनुसार सुरक्षा रक्षक १ ते २९ मिनिटे उशिरा आला, तर त्याचा अर्धा तास आणि ३१ ते ६० मिनिटे उशिरा आला तर एक तास कापण्यात येतो. मात्र, ओव्हर टाइम करूनही त्यांना पैसे मिळत नसल्याने अन्याय होत असल्याची भावना ते व्यक्त करत आहेत. शिवाय पदे रिक्त असल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याने ही पदे तातडीने भरण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकर्मचारी