Join us

मराठी भाषेचा अपमान केल्यावरून सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा चोप, व्हायरल व्हिडीओनंतर गुन्हा केला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:55 IST

MNS News: बीग बास्केटचे पार्सल घेऊन आलेल्या मराठी तरुणासोबत झालेल्या वादानंतर मराठी भाषेचा अपमान केल्याच्या आरोपावरून सुरक्षा रक्षकाला संतप्त मनसैनिकांनी मारहाण केल्याची घटना पवईत घडली.

मुंबई  - बीग बास्केटचे पार्सल घेऊन आलेल्या मराठी तरुणासोबत झालेल्या वादानंतर मराठी भाषेचा अपमान केल्याच्या आरोपावरून सुरक्षा रक्षकाला संतप्त मनसैनिकांनी मारहाण केल्याची घटना पवईत घडली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी मारहाण करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षक भवानीप्रसाद झा (४०) याच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी मंगळवारी मनसैनिकांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

मूळचे बिहार राज्यातील दरभंगाचे रहिवासी असलेले भवानीप्रसाद झा हे अंधेरी पूर्वेकडील मरोळ पाइपलाइन परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते एका मॅनेजमेंट सोल्युशन प्रा. लि. कंपनीत गेल्या चार वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतात. कंपनीने सध्या त्यांची पवईतील साकीविहार रोडवर असलेल्या एल अँड टी एमराल्ड या रहिवासी कॉम्प्लेक्समध्ये नेमणूक केली आहे. ३१ मार्चच्या रात्री ते ड्युटीवर असताना बीग बास्केटचे पार्सल घेऊन एक दुचाकीस्वार आला. झा यांनी त्याला पार्सल डिलिव्हरीबाबत हिंदीतून विचारपूस केली.  अजिंक्य नावाच्या त्या तरुणाला झा यांनी हिंदीतून विचारपूस केल्याचा राग आला. पार्सल पोहोच करून परतत असताना त्याने झा यांना शिवीगाळ केली. झा यांनी त्याला विचारणा केली असता त्याने मराठीमध्ये बोलण्याचा आग्रह धरत व्हिडीओ सुरू केला.

मराठी गई तेल लगाने...तो मराठीत बोलण्याचा आग्रह करत असल्याने ते ‘मराठी गई तेल लगाने, तुम गाली क्यू देता है’ असे बोलले. त्यावर धमकी देत निघून गेलेला अजिंक्य तीन तरुसोबत आला. त्यांनी झा यांना माफी मागण्यास भाग पाडले.  झा यांनी पवई पोलिस ठाण्यात अजिंक्य याच्यासह त्याचे साथीदार विजय निकम, संजय मुळे आणि महेश गिरम यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

टॅग्स :मराठीमनसेमुंबई