Join us

'सेक्युलॅरिझम म्हणजे लांगूलचालन झालंय, सेक्युलर नेते आता मंदिरात जाऊ लागलेत'; फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 05:49 IST

सेक्युलॅरिझम म्हणजे लांगूलचालन झाले आहे, असा आरोप करतानाच बराच काळ देशातील नेत्यांना मंदिरात जायची लाज वाटायची.

मुंबई :

सेक्युलॅरिझम म्हणजे लांगूलचालन झाले आहे, असा आरोप करतानाच बराच काळ देशातील नेत्यांना मंदिरात जायची लाज वाटायची. कोणी मंदिरात जाताना पाहिले तर सेक्युलर मते जातील, अशी भीती असायची. परंतु, नरेंद्र मोदींच्या काळात आता राहुल गांधीही मंदिरात जायला लागले. केजरीवाल हनुमान चालिसा म्हणताहेत, तर ममता बॅनर्जी चंडीपाठ म्हणताय, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी लगावला.

स्वामी विश्वेश्वरानंद महाराज यांच्या सन्यस्त जीवनाच्या स्वर्ण महोत्सवी कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढा, उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, खा. गोपाळ शेट्टी, आ. योगेश सागर, आ. अमित साटम, काँग्रेस नेते नसीम खान उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, काहींना वाटत की इंग्रजांनी जो इतिहास लिहिला तो योग्य आहे. पण, इंग्रजांना आपल्यावर आक्रमण करायचे होते, त्यामुळे त्यांनी तसा इतिहास लिहिला. आपल्यावर आक्रमण झाले तेव्हा तेव्हा सनातन संस्कृतीला सुरक्षित ठेवण्याचे काम संतांनी केले. ज्यांना आपली संस्कृती माहिती नाही त्यांना हे कळलंच नाही की सनातन संस्कृती काय आहे. आज आपण आपल्या संविधानात याच सनातन संस्कृतीचे रूप पाहू शकतो. या अभिनंदन सोहळ्याच्या निमित्ताने आचार्यांचे आशीर्वाद घ्यायला मी आलो, असे फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी शरद पवारांच्या विधानावरही उत्तर दिले. शरद पवार काय बोलले मला माहीत नाही. मात्र, मी ट्विटच्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडली आहे. सांप्रदायिकता वाढविण्याचे काम सुरू आहे, असे म्हटले जात आहे. त्यावर दुटप्पीपणा उघड केला.  सेक्युलॅरिझम म्हणजे लांगुलचालन बनविले गेले आहे, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपा