Join us
Daily Top 2Weekly Top 5

टँकर माफियांना अधिकाऱ्यांची छुपी मदत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:14 IST

पाणीप्रश्नावर सभागृहात सदस्यांनी उठविला आवाज

मुंबई : मुंबईतील पाणी प्रश्नावर मंगळवारी पालिका सभागृहात जोरदार चर्चा झाली. यावेळी २५ हून अधिक नगरसेवकांनी प्रभागांतील समस्या मांडत प्रशासनाला धारेवर धरले. टँकरमाफियांना पालिका अधिकारीच छुपी मदत करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. साहाय्यक आयुक्तांनी निवेदन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन पालिकेच्या टँकर सेवेच्या कार्यपद्धतीत बदल केले जातील, असे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सभागृहाला सांगितले. नगरसेवक रितेश राय यांनी के दक्षिण विभागातील अशुद्ध व अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. वाढती लोकसंख्या, नवीन बांधकामे, जुन्या जलवाहिन्या, गळती, पाणीचोरी, असमान वितरण यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना टँकरशिवाय पर्याय नाही. मात्र, खासगी टँकरचालक अव्वाच्या सव्वा पैसे घेत आहेत, असे ते म्हणाले.   

सभागृहनेते गणेश खणकर म्हणाले, ८० टक्के खासगी टँकर हे पालिकेच्या पाण्याद्वारे सुरू आहेत. टँकर फिलिंग पॉइंटवर किती ते किती आणि केव्हा पाणी भरावे, यासाठी नियम नाहीत. टँकरमाफियांचे वाढते पेव लक्षात घेऊन प्रशासनाने सभागृहात निवेदन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. 

प्रश्न सोडवू : बांगरसभागृहातील चर्चेनंतर अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी गारगाई प्रकल्प, निःक्षारीकरण प्रकल्प यांची माहिती सभागृहाला दिली. पाण्याचे असमान वितरण, गळती, दूषित पाण्याच्या तक्रारी सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले. 

पाणी वितरणात दुजाभाव का?एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनी झोपडपट्टीतील नागरिकांना दिवसाला ४५ एमएलडी, तर इमारतींमधील रहिवाशांना १३५ एमएलडी पाणी दिले जाते. हा दुजाभाव का, असा प्रश्न उपस्थित केला. भाजपचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी जलअभियंता विभागातील अधिकाऱ्यांच्या अनियोजित कारभारावर प्रश्न उपस्थित केला. शहर आणि उपनगरातील विहिरी, बोअरवेल यांची मालकी पालिका घेणार होती, त्या प्रस्तावाचे काय झाले, असा सवाल केला. तर, यामिनी जाधव यांनी अशुद्ध पाणीपुरवठ्यावर बोट ठेवले. उद्धवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग न करता निःक्षारीकरण प्रकल्प कशासाठी? ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे नेमके काय झाले, असे प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी, भाजपच्या प्रीती सातम, उद्धवसेनेचे सचिन पडवळ आदींनी पाणीप्रश्नावर आपले मत मांडले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Officials secretly aiding tanker mafia, alleges corporators in BMC meet.

Web Summary : Corporators accused officials of aiding tanker mafia during BMC meeting. Irregular water supply, private tanker rates, and unequal distribution were questioned. Garagai project assurances given.
टॅग्स :पाणीमुंबई महानगरपालिका