नेरुळ-उरण लोकलचा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी; मुंबईपर्यंतच्या थेट प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 09:00 AM2021-10-19T09:00:42+5:302021-10-19T09:00:59+5:30

उरणहून थेट मुंबईला किंवा तिकडून उरणला येणाऱ्या प्रवाशांना आणखी एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार

second phase of Nerul Uran local will be completed in next year | नेरुळ-उरण लोकलचा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी; मुंबईपर्यंतच्या थेट प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा

नेरुळ-उरण लोकलचा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी; मुंबईपर्यंतच्या थेट प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा

Next

नवी मुंबई :  नेरुळ-उरण दरम्यानच्या उपनगरीय रेल्वेमार्गावरील खारकोपर ते उरण दरम्यानच्या  दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील नेरुळ ते खारकोपरपर्यंत लोकल सेवा सुरू आहे.  सप्टेंबर २०२२ पासून नेरुळ ते उरणदरम्यान थेट प्रवासी सेवा सुरू होईल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उरणहून थेट मुंबईला किंवा तिकडून उरणला येणाऱ्या प्रवाशांना आणखी एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

नेरुळ ते उरणपर्यंतच्या सुमारे २७ किमी अंतराच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा नोव्हेंबर २०१८ मध्ये  प्रारंभ झाला. त्यापुढील म्हणजेच खारकोपर ते उरणपर्यंतच्या १४.६  किमी अंतराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे.  हा टप्पा मार्च २०२१ मध्ये पूर्ण करण्याचा निर्धार सिडको आणि मध्य रेल्वेने केला होता. परंतु भूसंपादनाचा तिढा आणि पर्यावरण विभागाची परवानगी आदींमुळे या कामाला काही प्रमाणात खीळ बसली होती. परंतु हा तिढा सोडविण्यात सिडकोला यश आले आहे. त्यानुसार  मध्य रेल्वेने प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढविला आहे. 
गव्हाण ते उरण दरम्यानच्या ११ किमी क्षेत्राच्या पट्ट्यातील रेल्वेमार्ग व संबंधित कामे पूर्ण झाली आहेत. मात्र दुसऱ्या टप्प्यात समावेश असलेले गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी आणि उरण या पाच स्थानकांसह रेल्वेमार्गाची कामे प्रगतिपथावर आहेत. आतापर्यंत जवळपास ८० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे.  सध्या दोन मोठे पूल, उड्डाणपुलाखालील दोन मोठे रस्ते, चार ओव्हरब्रिज रस्ते आदी प्रमुख परंतु तितकेच महत्त्वाची कामे शिल्लक आहेत. सप्टेंबर २०२३ पर्यंत ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे.  ही कामे पूर्ण झाल्यानंतरच  उरण ते नेरुळदरम्यान थेट लोकल सेवा सुरू केली जाणार आहे. 

नवी मुंबईसह ठाणे ते पनवेलपर्यंत ट्रान्स हार्बर लोकल सेवेने जोडले गेले आहे. मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेने नवी मुंबईत येण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. नेरुळ-उरण ही स्वतंत्र लोकल मार्गिका असल्याने या परिसरातील प्रवाशांसाठी ती उपयुक्त ठरेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

दुसऱ्या टप्प्याची संपूर्ण जबाबदारी मध्य रेल्वेची
nसिडको आणि मध्य रेल्वेच्या संयुक्त सहकार्यातून नेरुळ-उरण लोकल मार्गाची उभारणी केली जात आहे. या प्रकल्पाच्या खर्चात  सिडकोचा ६६ तर मध्य रेल्वेचा ३४ टक्के सहभाग आहे. करारानुसार दुसऱ्या टप्प्याची संपूर्ण जबाबदारी मध्य रेल्वेची आहे. 
nतर प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या व इतर अडथळे दूर करण्याची जबाबदारी सिडकोवर आहे. दुसऱ्या टप्प्याच्या मार्गात भूसंपादनाचा प्रमुख अडथळा होता. 
nखारकोपर ते गव्हाण दरम्यानच्या तीन किमी क्षेत्रातील जागेच्या भूसंपादनाचा तिढा सिडकोची डोकेदुखी बनला होता. मात्र हा अडथळा दूर करण्यात सिडकोला यश आले आहे.

Web Title: second phase of Nerul Uran local will be completed in next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.