बहुप्रतीक्षित मोनोचा दुसरा टप्पा अखेर २ फेब्रुवारीला होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 03:31 IST2019-01-01T03:31:42+5:302019-01-01T03:31:59+5:30
बहुप्रतीक्षित मोनोरेल्वेचा वडाळा ते जेकब सर्कल दरम्यानचा दुसरा टप्पा अखेर नवीन वर्षात २ फेब्रुवारीपासून सुरू होईल. कामातील निष्काळजीमुळे स्कोमी कंपनीकडून मोनोचे व्यवस्थापन काढून ते एमएमआरडीएने स्वत:कडे घेतले आहे.

बहुप्रतीक्षित मोनोचा दुसरा टप्पा अखेर २ फेब्रुवारीला होणार सुरू
- अजय परचुरे
मुंबई : बहुप्रतीक्षित मोनोरेल्वेचा वडाळा ते जेकब सर्कल दरम्यानचा दुसरा टप्पा अखेर नवीन वर्षात २ फेब्रुवारीपासून सुरू होईल. कामातील निष्काळजीमुळे स्कोमी कंपनीकडून मोनोचे व्यवस्थापन काढून ते एमएमआरडीएने स्वत:कडे घेतले आहे. त्यानंतर आता एमएमआरडीएने दुसऱ्या टप्प्यातील सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या असून येत्या २ फेब्रुवारीपासून मोनोचा दुसरा टप्पा सुरू होईल.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर मोनोरेल्वेचा चेंबूर ते वडाळा दरम्यानचा पहिला बंद टप्पा १ सप्टेंबर २०१८ पासून सुरू झाला. आहे. मात्र या टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मिळत नाही. मुळात वडाळा ते जेकब सर्कल दरम्यानच्या दुसºया टप्प्याला सर्वात जास्त मागणी आहे. दुसरा टप्पा औद्योगिक क्षेत्रात असल्यामुळे या भागात चाकरमान्यांची दररोजची ये-जा असते. या भागात राहणाºया मुंबईकरांन मोनोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यावर वाहतुकीसाठी नवा पर्याय मिळेल. एमएमआरडीएने याचा सारासार विचार करून २ फेब्रुवारीपर्यंत हा बहुचर्चित टप्पा मुंबईकरांच्या सेवेत आणण्यासाठी कंबर कसली आहे.
वडाळा ते जेकब सर्कल हा मोनोरेल्वेचा दुसरा टप्पा ११.२८ किलोमीटरचा आहे. या टप्प्यात एकूण ११ स्थानके आहेत. दुसरा टप्पा मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या परिसरातून पुढे जातो. त्यामुळे तो पूर्ण झाल्यानंतर मोनोचा मोठ्या प्रमाणात वापर होईल, असे स्थानिकांचे मत आहे. हा टप्पा सुरू झाल्यास एमएमआरडीएला आर्थिकदृष्ट्या फायदाच होणार आहे. यासाठी स्कोमीकडून आर्थिक व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेऊन दुसºया टप्प्यासाठी आवश्यक १० मोनोरेल्वे आपल्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. जानेवारी महिन्यात या सर्व गाड्यांची दुसºया टप्प्यातील स्थानकांवर रीतसर चाचणी घेतली जाईल.
या चाचणीनंतर २ फेब्रुवारीपासून ही मोनोरेल्वे मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मोनोच्या दुस-या टप्प्यातील स्थानके
गुरू तेग बहादुर नगर, अॅण्टॉप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज, दादर, नायगाव, आंबेडकरनगर, मिंट कॉलनी, लोअर परळ, चिंचपोकळी, जेकब सर्कल