सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 06:29 IST2025-10-10T06:29:01+5:302025-10-10T06:29:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रासायनिक अमली पदार्थ (एमडी) व्यवहारातून घडलेल्या अपहरण प्रकरणात गुन्हे शाखेने कुख्यात गुन्हेगार सलीम डोला ...

सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रासायनिक अमली पदार्थ (एमडी) व्यवहारातून घडलेल्या अपहरण प्रकरणात गुन्हे शाखेने कुख्यात गुन्हेगार सलीम डोला आणि छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेख यांचा शोध सुरू केला आहे. विशेष मोक्का न्यायालयात गुरुवारी या प्रकरणात १४ आरोपींविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, डोला, अन्वरसह पाच जण सध्या पसार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात शब्बीर सिद्दीकी याने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासात समोर आले की, अन्वर शेखचा साथीदार सरवर खान याने साजीद इलेक्ट्रीकवाला याला एमडी उत्पादनासाठी ५० लाख रुपये दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही ना एमडी मिळाले ना पैसे परत मिळाले. त्यामुळे सरवरने जून महिन्यात साजीद आणि तक्रारदार सिद्दीकी यांचे अंधेरीतील एका हॉटेलमधून अपहरण केले. त्यांना नेरूळ येथील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. सिद्दीकीने प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका केली आणि तक्रार दिली. त्यानंतर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पथकाने आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे.