शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेंना जामीन, वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना घडल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 08:39 IST2025-01-12T08:39:43+5:302025-01-12T08:39:59+5:30

वादळी वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचा दावा करत आपटे यांनी जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयाला केली होती.

Sculptor Jaideep Apte granted bail in Shiva statue collapse case, claims storm caused accident | शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेंना जामीन, वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना घडल्याचा दावा

शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेंना जामीन, वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना घडल्याचा दावा

मुंबई : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिल्पकार जयदीप आपटे यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. न्या. एन. आर. बोरकर यांच्या एकलपीठाने आपटे यांची २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केली.

वादळी वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचा दावा करत आपटे यांनी जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. भारतीय न्याय संहिता आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याने आपटे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 

पुतळ्याबाबत नौदल डॉकयार्डने कधीही तक्रार केली नाही. ज्यांना धातुशास्त्रात तांत्रिक कौशल्य नाही, अशा पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्याने घटनेनंतर नऊ तासांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली, असे आपटे यांनी याचिकेत म्हटले होते. तसेच नोव्हेंबरमध्ये या घटनेतील आरोपी चेतन पाटील याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, असे जयदीप आपटे यांचे वकील सोवनी यांनी न्यायालयाला सांगितले होते. 

आरोपीचे म्हणणे...
पुतळा कोसळल्यामुळे एकाही व्यक्तीला दुखापत झाली नाही. त्यामुळे शिल्पकाराला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, असे जयदीप आपटे यांचे वकील गणेश सोवनी यांनी न्यायालयाला सांगितले.

प्रकरण काय?
    मालवणमधील राजकोट किल्ल्यावर ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
    मात्र गेल्यावर्षी  २६ ऑगस्टला हा पुतळा कोसळला. हा १२ फूट उंचीचा पुतळा दोन कोटी ४४ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आला होता.

Web Title: Sculptor Jaideep Apte granted bail in Shiva statue collapse case, claims storm caused accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.