भाजपकडून बोरीवली विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी
By मनोहर कुंभेजकर | Updated: October 4, 2024 19:58 IST2024-10-04T19:58:11+5:302024-10-04T19:58:18+5:30
४० ते ५० भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बोरीवली विधानसभेचा आपला पुढील उमेदवार कोण असावा यासाठी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.

भाजपकडून बोरीवली विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी
मुंबई : भारतीय जनता पक्षाने बंद लिफाफा पद्धतीने राज्यात उमेदवार निवड प्रक्रिया सुरु केल्याचे दिसून येत आहे. यंदा महाराष्ट्रात भाजपतर्फे १६० विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या पदाधिकाऱ्यांना बंद लिफाफ्यात आपल्याला कोण उमेदवार पाहिजे, अशा क्रमाने ३ उमेदवाराचे नाव लिहून देण्याची प्रक्रिया अवलंबिली आहे.
येत्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील विधानसभेचे रणशिंग कधीही फुंकले जाण्याची शक्यता आहे. विधानसभेचा बिगुल वाजण्याआधी प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार आपापल्या परीने विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. २०१९ पासून बोरीवली मतदार संघाचे सुनील राणे हे आमदार आहेत. मात्र बोरीवली विधानसभेत इतर देखील इच्छुक उमेदवार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बोरीवली विधानसभेसाठी देखील निरिक्षक म्हणून माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया नुकतीच बोरीवली पश्चिम गोखले शाळेत पार पडली.
साधारणपणे बोरीवली विधानसभेत रहाणाऱ्या ४० ते ५० भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बोरीवली विधानसभेचा आपला पुढील उमेदवार कोण असावा यासाठी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यांनी बंद लिफाफ्यात आपल्याला कोण उमेदवार पाहिजे अशा क्रमाने ३ उमेदवाराचे नाव लिहून देण्याची प्रक्रिया पार पाडली. अशा प्रकारे उमेदवार निवडतंत्र वापरले असल्याने कार्यकर्त्यांमधे देखील उत्सुकता असल्याचे दिसून आले. त्यामुळे येथे योग्य उमेदवार मिळेल अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये होती.