पत्नीला रंगावरून टोमणे मारणे म्हणजे क्रूरता नव्हे : उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 11:54 IST2025-07-27T11:52:37+5:302025-07-27T11:54:29+5:30
उपलब्ध पुराव्यांवरून दिलेल्या शिक्षेचे समर्थन होत नाही.

पत्नीला रंगावरून टोमणे मारणे म्हणजे क्रूरता नव्हे : उच्च न्यायालय
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पत्नीला काळ्या रंगावरून टोमणे मारणे, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ (अ) अंतर्गत क्रूरता ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने एका पतीची निर्दोष सुटका केली. सत्र न्यायालयाने १९९५ मध्ये संबंधित पतीला ४९८ (अ) (क्रूरता) ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत दोषी ठरवत पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती.
उपलब्ध पुराव्यांवरून दिलेल्या शिक्षेचे समर्थन होत नाही. प्रेमाला (पत्नी) तिच्या रंगामुळे टोमणे मारण्यात आले तरीही हा प्रकार कलम ४९८ (अ) अंतर्गत ‘क्रूरते’च्या व्याख्येत बसत नाही. तसेच कलम ३०६ अंतर्गत ठोठावण्यात आलेली शिक्षाही कायम ठेवण्यात येत नाही. कारण पत्नीने पतीच्या छळामुळे आत्महत्या केल्याचे सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत, असे न्या. एस.एम. मोडक यांच्या एकल पीठाने म्हटले.
संबंधित दाम्पत्याचा १९९३ मध्ये विवाह झाला. मात्र, पत्नीने १९९५ मध्ये आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पती व सासऱ्याला अटक केली. सत्र न्यायालयाने सासऱ्याची निर्दोष सुटका केली. तर पतीला दोषी ठरविले होते.