Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:57 IST2025-11-20T13:56:06+5:302025-11-20T13:57:44+5:30
Mumbai School Food Poisioning News: मुंबईतील घाटकोपरच्या केव्हीके शाळेतील विद्यार्थ्यांना कॅन्टीनमधील कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विषबाधा झाली.

representative Image
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घाटकोपरच्या केव्हीके शाळेतील विद्यार्थ्यांना कॅन्टीनमधील कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विषबाधा झाली. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एन प्रभागातील शाळांना दिले आहेत. उपाहारगृहात स्वच्छता राखण्यासह विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा सकस आहार मिळण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
केव्हीके शाळेने शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या खुलाशात शाळेची बाजू मांडली. कॅन्टीन चालकाकडून देव्हाऱ्यातील कापूर चुकून तेलात पडला. या तेलात तळलेले समोसे खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. ही घटना सकाळी १० वाजता घडली. यावेळी अनुदानित प्राथमिक इंग्रजी व गुजराती शाळेतील विद्यार्थी शाळेत नव्हते. कारण, अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा दुपारी पावणेएकच्या सुमारास भरते, अशी भूमिका शाळेने मांडली आहे. आमच्या विभागातील सर्व शाळांना निर्देश दिलेले आहेत. शाळांमध्ये जिथे कुठे उपाहारगृह असेल, त्या ठिकाणी फूड सेफ्टी नियमांचे काटेकर पालन करणे आवश्यक आहे, असे निर्देश महानगरपालिकेचे एन विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र हंगे यांनी दिले.
कॅन्टीन चालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल
पोलिसांनी शाळेचा कॅन्टीन मालक आणि चालक सुंदर गोपाल देवाडिगा (६३) विरोधात हलगर्जी व निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार दिनेश जयसिंग शिंगोटे (४२) हे ६ नोव्हेंबरला गस्त घालत असताना विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याबद्दलची माहिती मिळाली होती. घटनेबाबत कळताच पालिका अधिकारी डॉ. रवींद्र हांगे व विलास पांडुरंग रत्नाकर (सॅनिटरी इन्स्पेक्टर) आणि संदीप जाधव (फायर स्टेशन ऑफिसर, विक्रोळी) यांनी तेलाचे नमुने ताब्यात घेतले, तर संदीप जाधव यांनी चार गॅस सिलिंडर व गॅस शेगडी तपासणीसाठी ताब्यात घेतली. हांगे यांनी कॅन्टीन चालक/मालक सुंदर देवाडिगा यांना कॅन्टीनच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे आरोग्य विभागाचा परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले.