Join us

अकरावीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ‘इन हाऊस कोट्यात’; १० टक्के जागा आरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 08:31 IST

शिक्षण विभागाने ३१ मे रोजी शासन निर्णय जारी केला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अकरावी ऑनलाइन प्रवेशामध्ये याआधी जेथे एकाच संस्थेच्या आवारात दहावी व कनिष्ठ महाविद्यालय असेल, तरच इन हाऊस कोटा लागू होत होता. आता त्याच संस्थेचे त्या परिसराबाहेर, मात्र जिल्ह्याच्या आत जर महाविद्यालय असेल, तर विद्यार्थ्यांना तेथे ऑनलाइन प्रवेश मिळेल. याबाबत शिक्षण विभागाने ३१ मे रोजी शासन निर्णय जारी केला. अकरावी प्रवेश प्रक्रियेत एकाच संस्थेच्या आवारात दहावी  आणि कनिष्ठ महाविद्यालय असेल तरच इन हाऊस कोट्यात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. मात्र  एखाद्या  संस्थेची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय दुसऱ्या ठिकाणी असेल, तर आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवेळी पसंतीक्रम म्हणून ती शाळा निवडता येणार आहे.

असा मिळाला दिलासा 

यावर्षी इन हाऊस कोट्यांतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा किंवा  महाविद्यालय संलग्न संस्थांच्या शाळा या एक युनिट म्हणून ग्राह्य धरण्यात येतील. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी  त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा,  महाविद्यालय यासाठी महसुली जिल्ह्यामध्ये एक युनिट इन हाऊस कोटा ग्राह्य धरण्यात येईल, असे शिक्षण विभाग कक्ष अधिकारी मृणाली काटेंगे यांनी आदेश पत्रात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :शिक्षणमहाविद्यालय