धोकादायक स्थितीत भरतेय शाळा

By admin | Published: September 15, 2014 01:47 AM2014-09-15T01:47:36+5:302014-09-15T01:47:36+5:30

पालिकेच्या शिक्षण समितीचे दुर्लक्ष असलेली प्रभादेवीतील बाल विकास शिक्षण सेवेची शाळा आजही धोकादायक परिस्थितीत भरत असल्याचे निदर्शनास आले

School filled with dangerous situations | धोकादायक स्थितीत भरतेय शाळा

धोकादायक स्थितीत भरतेय शाळा

Next

मुंबई : पालिकेच्या शिक्षण समितीचे दुर्लक्ष असलेली प्रभादेवीतील बाल विकास शिक्षण सेवेची शाळा आजही धोकादायक परिस्थितीत भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार मागणी करूनही पालिकेची शिक्षण समिती संस्थेला पर्यायी जागा देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवायचे की नाही, अशी भीती पालकांच्या मनात निर्माण झाली आहे.
येथील सासमिरा मार्गावरील ११२ टेनामेंट या कर्मचारी वसाहतीत संस्थेची शाळा गेल्या दोन वर्षांपासून भरत आहे. शाळेसाठी पालिकेने येथील ४ निवासी गाळे शाळेला भाडेतत्त्वावर दिले आहेत. मात्र गेल्याच वर्षी येथील वर्ग गळके असल्याचे संस्थेच्या लक्षात आले. परिणामी या ४ निवासी गाळ्यांना पर्यायी जागा म्हणून प्रभादेवी येथील पालिकेच्या उच्च माध्यमिक शाळेतील रिकामे असलेल्या ८ वर्गांतील २ वर्ग संस्थेला देण्याची मागणी करण्यात आली. मात्र हे वर्ग पर्यायी जागा म्हणून देण्यास पालिकेने नकार दिल्याचे संस्थेने सांगितले.
पालिकेने पर्यायी जागा नाकारण्याचे कारण हास्यास्पद असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुभाष देसाई यांनी केला आहे. ‘संस्थेचे मुख्य कार्यालय असलेल्या एका खाजगी जागेचा पुनर्विकास होत असल्याने भविष्यात संस्थेला पर्यायी जागेची गरज भासणार नाही,’ असे तोंडी कारण पालिका देत असल्याचा दावा देसाई यांनी केला आहे. तरी पुनर्विकास प्रकल्पाचा सध्याच्या जागेशी संबंध नसल्याचे ते सांगतात.
शिवाय पुनर्विकास प्रकल्प सुरू होण्यास बराच अवधी असून तो पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे धोकादायक असलेल्या वर्गांऐवजी पर्यायी जागा देण्यास पालिकेला काय अडचण आहे, असा सवाल देसाई यांनी व्यक्त केला आहे.
संस्थेच्या प्राथमिक शाळेचे इंग्रजी माध्यमातील पाच वर्ग येथील तळमजल्यात भरतात. त्यात पहिले ते सातवी कक्षेतील सकाळ व दुपार सत्रात मिळून सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वरळी, प्रभादेवी आणि दादर परिसरातील मुले या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. वर्गांतील भिंतीची अवस्था बिकट असून, कोणत्याही क्षणी स्लॅब कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्गांतील भिंतींना तडे गेले असून पावसाचे पाणी थेट वर्गात येते. मुलांच्या अंगावर पाणी पडू नये, म्हणून संस्थेने तात्पुरती सोय म्हणून वर्गात मेनकापडे लावली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: School filled with dangerous situations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.