Join us  

शाळा बंद , सरल  आयडी आणायचा कुठून ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 6:36 PM

महाकरिअर पोर्टलवर लॉगिन करता न आल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थी निराश

मुंबई : तंत्रज्ञानात बदल होत असताना करिअरचे पर्याय निवडतानाही अनेक बदल होत आहेत आणि करिअरच्या पर्यायांची माहिती सहज व सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी महाकरिअर पोर्टलचे उदघाटन करण्यात आले. मात्र बुधवारपासून विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यात येणाऱ्या या पोर्टलच्या लॉगिनलाच विद्यार्थ्याना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे प्रकार समोर आले. अनेक विद्यार्थ्यांनी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला मात्र सरल आयडी उपलब्ध नसल्याने आणि सध्या शाळा प्रशासनाकडून त्याची कोणतेही माहिती मिळत नसल्याने पहिल्याच दिवशी पोर्टलबाबत विद्यार्थ्यांची प्रचंड निराशा झाल्याची परिस्थिती दिसून आली.आज विद्यार्थ्यांसाठी पारंपारिक अभ्यासक्रमा सोबतच आज करिअरसाठी अल्पावधीचे कोर्सेस, स्कील डेव्हलपमेंट, डिप्लोमा, कमवा शिका, करिअरच्या वेगवेगळ्या वाटा तयार झाल्या आहेत. अशा वेळी महा करिअर पोर्टलचे उद्घाटन झाले मात्र या पोर्टलवरची माहिती पाहण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड ठेवण्यात आला आहे. वस्तुतः या पोर्टलवरची माहिती गोपनीय, वैयक्तिक स्वरूपाची नसतानाही, त्यासाठी युजर आयडी आणि पासवर्डची अट ही अनाकलनीय आहे. या पोर्टलचा वापर सर्वांसाठी खुला असणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया सिस्कॉमच्या वैशाली बाफना यांनी दिली. आज शासनाने शिक्षणाने होम लर्निंग, ओपन स्कूल सारख्या संकल्पना राबवीत असताना जर महा करिअर पोर्टलवर आयडी व पासवर्ड नसेल तर आपण या कोर्सेसची माहिती पाहू शकणार नाही. यातून विनाकारण शासनाची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते असे मत त्यांनी मांडले.विद्यार्थ्यांना सरल आयडी मिळविण्यासाठी शाळेशी संपर्क साधायला सांगितले आहे. पण सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. मुंबई रेडझोनमध्ये आहे; अशावेळी विद्यार्थ्यांना शाळेशी संपर्क साधण्यास सांगणे चुकीचे आहे.  शिवाय यावर पोर्टलवर असणाऱ्या कोर्सेसच्या माहितीसोबत त्याविषयीचे असणारे शासकीय धोरणे, शासन निर्णय यांचा देखील समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. महा करिअर पोर्टल म्हणजे शासकीय कामकाजाचा भाग नसून विद्यार्थ्यांच्या हितार्थ तयार केलेले पोर्टल आहे. कोणत्याही प्रकारचे आयडी पासवर्ड न वापरता ही माहिती सर्वांसाठी खुली असायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

टॅग्स :शिक्षणकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस