Join us  

'स्कूल चले हम'... पहिल्या दिवशी ‘प्रवेशोत्सवाने’ होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 8:06 AM

मोठ्या सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू

मुंबई : नवा गणवेश, दप्तर, नव्या कोऱ्या वह्यांचा सुगंध अशा जय्यत तयारीनिशी मोठ्या सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू होणार आहेत. विदर्भ वगळता १७ जूनपासून राज्यभरातील शाळांमध्ये पहिली घंटा वाजणार असून, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये ‘प्रवेशोत्सव’ साजरा होणार आहे.दोन महिन्यांपासून सुट्टीनंतर शाळांचे प्रवेशद्वार सोमवारी उघडण्यात येणार आहे. शाळा प्रशासनाने शाळेचा परिसराची साफसफाई करून चकाचक केला आहे. आज हजारो चिमुकली पावले पहिल्यांदा शाळेत प्रवेश करणार आहेत. यासह सुट्टीची मज्जा घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसांची मज्जा घेणार आहेत.

सुट्टीनंतर कामावर परतणे असो किंवा उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा शाळेच्या वर्गाकडे परत फिरणे असो.. उत्सुकता तर सर्वांनाच असते ती पहिल्या दिवसाची. आजपासून शाळांना सुरुवात होत असून हजारो पाऊले आज पहिल्यांदाच शाळेत पडणार आहेत. पहिल्या दिवशी आपल्या आई-वडिलांसह रडत रडत शाळेच्या बाकावर ही चिमुकली स्थिरावणार आहेत. शाळेचा गणवेश, पाटी-पेन्सील, वॉटरबॅग यांसह एक-दोन पुस्तके घेऊन या बाल-गोापालांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा श्रीगणेशा आज होत आहे. कुणी हसत हसत, तर कुणी रडत-पडत शाळेची पायरी चढणार आहे. पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणारी चिमुकली मुले नवीन मित्रांच्या संगतीने शाळेतला पहिला दिवस घालवतील. तर, सुट्टीवरुन परतणारी मुले नवीन वर्गातील आपला बेंच फिक्स करण्यासाठी धडपडतील, नवीन वर्गातील नवीन वर्गशिक्षक आणि नवीन सजावटीची उत्सुकता या विद्यार्थ्यांना लागलेली असते. तसेच, नवीन वर्गात आपला बेंचमेट कोण हेही ठरवण्याची घाई या विद्यार्थ्यांना असते. एकूणच शाळेचा पहिला दिवस म्हणजे नव्या दमाची नवी सुरुवात असंच म्हणता येईल.   

एकीकडे विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील घालमेल, तर दुसरीकडे शाळांचीही प्रवेशोत्सवाची तयारी जय्यत असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते, या हेतूने नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस उत्सवरूपी साजरा करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने या आधीच दिल्या आहेत. त्यानुसार, शाळेच्या पहिल्या दिवशी फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पुस्तक वितरण कार्यक्रम होणार आहेत. पहिल्या दिवशीच्या माध्यान्ह भोजनात गोड पदार्थांचा समावेश करावा, अशा सूचनाही शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे आणि प्रसन्न वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी वाढणार असून, उपस्थिती वाढीस मदत होईल, असे मत शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आले. 

टॅग्स :शाळामुंबईविद्यार्थी