Join us  

मुंबईतील शाळांची घंटा १५ डिसेंबरपासून वाजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 7:47 AM

School News: राज्यातील बहुतांश शाळा बुधवारपासून अनलॉक होत असल्या तरी मुंबईतील शाळांची घंटा मात्र १५ डिसेंबरपासून वाजणार असल्याचे पालिका शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 मुंबई : राज्यातील बहुतांश शाळा बुधवारपासून अनलॉक होत असल्या तरी मुंबईतील शाळांची घंटा मात्र १५ डिसेंबरपासून वाजणार असल्याचे पालिका शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका प्रशासनाकडून मुंबईतील शाळा २ आठवडे उशिराने सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे. यादरम्यान शाळांच्या इमारतींचे निर्जंतुकीकरण करणे, वर्गांचे नियोजन करणे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनांना देण्यात आल्या आहेत.

राज्यात शाळा आजपासून सुरू होत असल्या तरी मुंबईतील शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना मास्कसाठी खरेदी आदेश काढून त्याचा ठेकेदाराकडून शाळांना पुरवठा करणे व नंतर विद्यार्थ्यांना वाटप करणे, काही शाळांमधील सुरू असलेली लसीकरण व कोविड केंद्रे अन्यत्र स्थलांतरित करणे, विद्यार्थ्यांच्या शालेय वेळा निश्चित करणे, पालकांकडून संमती पत्र घेणे, कोविडविषयक मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन व्यवस्थापन करणे या सर्व नियोजनासाठी शाळा व्यवस्थापनांना पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि पालिका शिक्षण विभाग यांच्याकडून १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तडवी यांनी दिली.

 पालिका शिक्षण विभागाने केलेल्या सूचना

- शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर कोविड -१९ विषयक आवश्यक सर्व स्वच्छता व सुरक्षा मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन आवश्यक आहे- कोविड सेंटर, रेल्वे स्टेशनवर कोविड प्रमाणपत्र पडताळणी, निवडणूकविषयक कामांतून शिक्षकांची त्वरित कार्यमुक्ती करावी- शाळा नजीकच्या महापालिका किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्नित करून घेणे आवश्यक आहे.- जे विद्यार्थी ऑफलाइन वर्गासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांना ऑनलाइन शिकवणी आणि शिक्षकमित्र, पालकमित्र, गृहभेटी अशा माध्यमांतून शिक्षण सुरू ठेवणे आवश्यक आहे.

 -पालिका क्षेत्रात सर्व व्यवस्थापनाच्या आठवी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळा - २६४२- या शाळांतील विद्यार्थीसंख्या - सुमारे ८ लाख- पालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते सातवीचे वर्ग असणाऱ्या शाळा - ३४२०- एकूण विद्यार्थीसंख्या - सुमारे साडेदहा लाख- महापालिका शाळांच्या एकूण शाळा- ११५९- एकूण विद्यार्थी - २,९२,०००-एकूण इमारती -४५०- एकूण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या - ६०,०००- लसीकरण झालेले कर्मचारी - ८२%

टॅग्स :शाळाकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस