मुंबईत नालेसफाईत घोटाळे सुरूच! दगड, माती टाकून वजन वाढवण्याचा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 14:17 IST2026-04-11T14:15:48+5:302026-04-11T14:17:17+5:30
अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपायुक्तांना चौकशीचे आदेश दिले

मुंबईत नालेसफाईत घोटाळे सुरूच! दगड, माती टाकून वजन वाढवण्याचा प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईत नालेसफाईबरोबरच घोटाळ्यांची मालिकाही सुरू झाली आहे. बोरीवली पश्चिम येथील मोठ्या नाल्याची सफाई करताना सफाईच्या नावाखाली रात्री बाहेरून दगड-माती, तसेच तोडलेल्या रस्त्याच्या तोडकामाचा राडारोडा नाल्यात टाकला जात आहे. सकाळी त्याच दगड-मातीला ‘नालेसफाई’ दाखवत वजन वाढवून पैसे घेण्याचा आणि पालिकेची फसवणूक करण्याचा प्रकार बोरीवलीतील आ. संजय उपाध्याय यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपायुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
यंदा नालेसफाई उशिराने सुरू झाली असून, कंत्राटदारांकडून केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांमुळे मुंबईतील नाल्यांमध्ये गाळ तसाच पडून आहे. गेल्या वर्षी नाल्यातील गाळामध्ये हेराफेरी करणाऱ्या दोन कंत्राटदारांना पालिका प्रशासनाकडून ब्लॅकलिस्टही करण्यात आले होते. मात्र, प्रत्येक ठिकाणी अधिकारी पोचू शकणार नसल्याने कंत्राटदारांकडून ही हेराफेरी चालूच असल्याचे दिसून येत आहे. यंदा लोकप्रतिनिधी स्वतः नालेसफाईच्या ठिकाणी भेट देत असल्याने हे गैरप्रकार उजेडात येत आहेत.
⚠️ महापालिकेच्या नालेसफाई कंत्राटदारांचा महा-भ्रष्टाचार उघड!
— Ankushdada Shobha Vasant Kurade (@KuradeAnkush) April 10, 2026
मुंबई उपनगरात असे प्रकार घडत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी ह्या गुन्ह्यात सहभागी आहेत.
नालेसफाईच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. रात्री बाहेरून दगड-माती नाल्यात टाकली जाते आणि सकाळी त्याच… pic.twitter.com/gW3JVHwPKg
नाला-गाळा डम्पिंग परिसरात यंदा जिओ फेन्सिंगचा वापर
नालेसफाईत कंत्राटदार गाळाच्या नावाखाली राडारोडा जमा करून वजन करून पैसे घेतले जात आहेत. अनेकदा हा प्रकार नाल्याच्या परिसरात न होता मध्येच कुठेतरी होताना यापूर्वी आढळले आहे. या कारणास्तव पालिकेने यंदा नाला परिसरात आणि गाळ डम्पिंग परिसरात जिओ फेन्सिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटदारांनी नाल्यातून काढलेला गाळ भरणे किंवा टाकणे या कारवाया संबंधित जिओ फेन्सिंगच्या आतच कराव्या लागणार आहेत. यामुळे पालिकेला त्यावर नजर ठेवणे आणि त्याची पडताळणी करणे शक्य होणार आहे. कंत्राटदारांकडून केल्या जाणाऱ्या हेराफेरीवार लक्ष ठेवण्यासाठी पालिका यंदा दुसऱ्या वर्षी एआयचा वापर करत आहे. मागच्या वर्षी एआयच्या माध्यमातून कंत्राटदारांवर एकूण १५ कोटींचा दंड आकारण्यात आला होता. तसेच ज्या २ कंत्राटदारांनी गाळाच्या नावाखाली राडारोडा टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते.
या संपूर्ण नाल्याची मी स्वतः अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली असता, नाल्यात प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या इत्यादी कचरा आढळला. मात्र, काही ठराविक ठिकाणी बाहेरून टाकलेली दगड - माती दिसून आली, ज्यामध्ये असा कचरा नव्हता. उलट सिमेंटचे तुटलेले स्लॅब्स, पिलर्स यांचा समावेश होता; हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
-आ. संजय उपाध्याय
गोराई रोड येथील नालेसफाईतही चलाखीचा प्रकार
गोराई रोड येथील मोठ्या नाल्याच्या सफाईत असाच प्रकार घडल्याचे प्रकरण उपाध्याय यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाच्या पारदर्शक कारभारासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी तत्काळ ही बाब ‘आर मध्य’ विभागाचे सहायक आयुक्त प्रफुल्ल तांबे यांच्या निदर्शनास आणली असून, संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती बांगर यांनी दिली.