पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 06:31 IST2025-04-20T06:29:23+5:302025-04-20T06:31:19+5:30

Mukhyamantri Sahayata Nidhi: मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रभारी सहायक संचालक देवानंद धनावडे यांच्या फिर्यादीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

Scam worth Rs 5.5 lakh; Fake documents, patient records found in mukhyamantri sahayata nidhi | पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या

पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या

मुंबई : महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी 'संजीवनी' ठरत असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उल्हासनगर येथील तीन डॉक्टरांनी बनावट कागदपत्रे आणि रुग्ण नोंदी तयार करून तब्बल ४ लाख ७५ हजार रुपयांचा निधी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

या प्रकरणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रभारी सहायक संचालक देवानंद धनावडे यांच्या फिर्यादीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

सदरील फसवणूक प्रकरणात, डॉ. अनुदुर्ग ढोणे (कल्याण, ठाणे), डॉ. ईश्वर पवार (धुळे) आणि डॉ. प्रदीप पाटील (गौरीपाडा, ठाणे) या तिघा आरोपींनी २६ मे २०२३ ते १० जुलै २०२३ या कालावधीत १३ बनावट रुग्णांचे अर्ज सादर केले. 

यापैकी ६ प्रकरणांमध्ये ४ लाख ७५ हजार रुपये अर्थसहाय्यच्या नावाखाली फसवणूक केली. या अर्जामध्ये रुग्णांची नावे, वैद्यकीय कागदपत्रे, युटिलायझेशन सर्टिफिकेट आणि अंदाजपत्रके बनावट असल्याचे तपासात उघड झाले.

११ जुलै २०२३ रोजी रुग्ण अरविंद सोळखी मेंदूच्या उपचारासाठी ३ लाख ७० हजार रुपये आणि रुग्ण भगवान भदाने यांच्या मेंदूच्या उपचारासाठी ३ लाख १० हजार या दोन प्रकरणांमध्ये संशयास्पद बाबी समोर आल्या होत्या.

कागदपत्रे, नोंदवही सादर केली नाही

छाननी दरम्यान रुग्णालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता, अरविंद सोळखी यांचे सरस्वती हॉस्पिटल, नालासोपारा येथे, तर भगवान भदाने यांचे गणपती हॉस्पिटल, अंबिवली येथे दाखल असल्याचे उघड झाले, जे अर्जातील माहितीशी विसंगत होते.

त्यानंतर तत्कालीन प्रभारी अधिकारी शिरीष पालव २ यांनी १५ जुलै २०२३ रोजी पथकासह गणपती हॉस्पिटलची पाहणी केली, परंतु डॉ. ढोणे यांनी कोणतीही कागदपत्रे किंवा नोंदवही सादर केली नाहीत. ईश्वर पवार आणि प्रदीप पाटील यांनी रुग्णालयाला पॅनेलवर घेण्यासाठी मदत केल्याचे आरोपींनी सांगितले.

गरीब रुग्णांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या, फसवणूक करणाऱ्यांवर शासन कोणतीही सूट देणार नाही. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होईल आणि भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील. -रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी

Web Title: Scam worth Rs 5.5 lakh; Fake documents, patient records found in mukhyamantri sahayata nidhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.