sayaji shinde apologize for the statement on 33 crore tree plantation | 'त्या' विधानाबद्दल एकदा नव्हे, दहादा दिलगिरी व्यक्त करतो; सयाजी शिंदेंचा SMS

'त्या' विधानाबद्दल एकदा नव्हे, दहादा दिलगिरी व्यक्त करतो; सयाजी शिंदेंचा SMS

ठळक मुद्दे'रागाच्या भरात दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ग्रामसेवकांबद्दल चुकीचा संदेश गेला.'मी दहादा दिलगिरी व्यक्त करतो असं सयाजी शिंदे यांनी व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून म्हटलं आहे. प्रशांत जामोदे हे ग्रामसेवक राज्य सरचिटणीस आहेत. त्यांना शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त करणारा एक मेसेज पाठवला

मुंबई - महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हे केवळ नाटक आहे. 33 कोटींची वृक्ष लागवड हे थोतांड आहे. या वृक्ष लागवडीवरुन भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातं. त्याच त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जाते असं विधान अभिनेता सयाजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. मात्र केलेल्या विधानाबाबत आता सयाजी शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 'रागाच्या भरात दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ग्रामसेवकांबद्दल चुकीचा संदेश गेला. मी दहादा दिलगिरी व्यक्त करतो' असं शिंदे यांनी व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून म्हटलं आहे.

प्रशांत जामोदे हे ग्रामसेवक राज्य सरचिटणीस आहेत. त्यांना सयाजी शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त करणारा एक मेसेज पाठवला आहे. 'ग्रामसेवक मित्रांनो एका ठिकाणची परिस्थिती पाहून रागाच्या भरात मी एका वाहिनीवर प्रतिक्रिया दिली. त्यातून ग्रामसेवकांबद्दल चुकीचा संदेश गेला. आपण सगळे उत्तम काम करता. यापुढे कधीच शासकीय कर्मचारी आणि व्यवस्थेवर बोलणार नाही. तुम्ही एकदा म्हणाला मी दहादा दिलगिरी व्यक्त करतो. तुमचे काम अप्रतिम आहे. माझ्या बोलण्यात गडबड झाली. तुमच्या भावी कार्याला शुभेच्छा!' असा मेसेज करून सयाजी शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

सयाजी शिंदे यांनी केलेल्या विधानाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यांनी उत्तर दिले होते. 33 कोटी वृक्षलागवड हा सरकारचा उपक्रम नसून स्वयंप्रेरणेनं आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ असल्याचं मुनगंटीवर यांनी स्पष्ट केलं होतं. सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला, त्यावर टीका करत सयाजी शिंदे म्हणाले की, मोजक्याच ग्रामपंचायती झाडं लावण्याचा उपक्रम करतात. 3 हजार 300 झाडे किती ग्रामपंचायतीने लावलेत? 33 कोटी वृक्ष लावल्यावर जपणार कुठे? पाणी आणणार कुठून? दरवर्षी लावलेल्या झाडांचे, त्याला जगविण्यासाठी आलेल्या खर्चाचा हिशोब द्यावा अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली. तसेच वृक्षांमध्ये 250 जाती आहेत. नगरपालिका शाळांच्या प्रत्येक अंगणात गुलमोहर, उंच झाडे दिसतील. दरवर्षी त्याच खड्ड्यात जाऊन झाडं लावली जातात. मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना वृक्षांच्या जातीची माहिती नाही. कोणतं झाड लावलं पाहिजे याची माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे केवळ नाटक आहे. असा संताप अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यावर, सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. 

सयाजी शिंदेंचा आरोप म्हणजे अज्ञान आणि माहितीचा अभाव असून 33 कोटी वृक्षलागवड ही सरकारी योजना नाही, तर आंदोलन असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटलंय. वृक्षलागवड हे केवळ वनविभागाचे कार्य नसून स्थानिक गाव व जिल्हापातळीवरील अनेक संस्था संघटनांचा यामध्ये सहभाग आहे. त्यासाठी, समित्याही गठीत करण्यात आल्या आहेत. तसेच, सरकारच्या नर्सरीमध्ये 156 प्रकारच्या प्रजातींचे वृक्ष आहेत. राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींना ही यादी आणि वृक्षांची रोपे पुरविण्यात आलेली आहेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितलं. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा आदर्श घेऊनच देशात 125 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. तर, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही आपल्या उपक्रमाची नोंद घेतल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं.   
 

Web Title: sayaji shinde apologize for the statement on 33 crore tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.