Join us
Daily Top 2Weekly Top 5

Saroj Khan Death: सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे निधन; बॉलिवूडवर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 07:36 IST

सरोज खान यांनी १९८६ पासून २०१९ पर्यंत अनेक सिनेमांमध्ये कोरियाग्राफी केली होती

मुंबई  - बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं. गेल्या २० जूनपासून मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज सकाळी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सरोज खान यांनी १९८६ पासून २०१९ पर्यंत अनेक सिनेमांमध्ये कोरियाग्राफी केली होती. ज्यात निंबुडा-निंबुडा, एक-दोन तीन, डोला रे डोला, काटे नही कटते, हवा-हवाई, ना जाने कहा से आई है, दिल धक धक करने लगा, हमको आजकल है इंतजार, चोली के पीछे यासारख्या अनेक सुपरहिट आणि ऐतिहासिक गाण्यांचा समावेश आहे.

सरोज खान यांनी तेजाब, खलनायक, मिस्टर इंडिया, चालबाज, नगीना, चांदनी, हम दिल दे चुके सनम, देवदास सारख्या प्रसिद्ध सिनेमातील कोरियाग्राफी केली होती. सरोज खान यांचे शेवटचे गाणं कलंक सिनेमातीत तबाह हो गए यासाठी कोरियाग्राफ केले होते. या गाण्यात माधुरी दिक्षित डान्स करताना दिसत आहे.

सरोज खान यांचे वय 71 वर्षे आहे. सरोज खानने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा जास्त गाणी दिली आहेत. त्यांनी शिकवलेल्या नृत्यमुळे बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना यश मिळाले. 1983 साली त्यांनी 'हिरो' चित्रपटातील गाण्यांची कोरियोग्राफी केली होती. तर कलंक हा त्याच्या शेवटचा सिनेमा आहे. आपल्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी सरोज खान यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.

सरोज खान यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली होती. पण ही चाचणी निगेटिव्ह आली होती. तेव्हापासून त्या रुग्णालयातच दाखल होत्या. दरम्यान, प्रकृती अधिकच खालावल्यानंतर आज सरोज खान यांचं निधन झालं आहे.

टॅग्स :सरोज खानबॉलिवूड