Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shivsena: संतोष बांगर अन् वाद एकत्र नांदतात, शिवसेना नेत्याना सांगितला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 13:58 IST

संतोष बांगर हे १०-१२ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात होते. यावेळी पोलिसाने त्यांना हटकले आणि नोंद करून जाण्यास सांगितले.

मुंबई - शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे, वादग्रस्त कृतीमुळे कायम चर्चेत असतात. आमदार संतोष बांगर यांनी नुकतेच मंत्रालयाच्या गेटवरील पोलिसांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. गुरुवारची ही घटना असून पोलिसाने वरिष्ठांकडे याची लेखी तक्रार केली आहे. यावर बांगर यांनी असे काही घडलेच नसल्याचे म्हटले आहे. संतोष बांगर यांच्या या कृत्याबद्दल बोलताना शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट शब्दात भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे संतोष बांगर यांनीही त्यांच्या प्रतिक्रियेवर तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे.  

संतोष बांगर हे १०-१२ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात होते. यावेळी पोलिसाने त्यांना हटकले आणि नोंद करून जाण्यास सांगितले. यावर बांगर यांनी या पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याची तक्रार या पोलीस कर्मचाऱ्याने केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. त्यानंतर, यासंदर्भात संतोष बांगर यांना विचारले असता, त्यांनी कुठलाही वाद झाला नसल्याचे म्हटले आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेज तपासावेत असेही ते म्हणाले. मात्र, संतोष बांगर आणि वाद हे एकत्र नांदणारे आहेत. मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही ते ऐकत नाहीत, असे म्हणत विधानपरिषद विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आमदार बांगर यांच्या मंत्रालयात पोलिसांसोबत झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर, आमदार बांगर यांनी कुठलाही वाद झालेला नसल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, मला मुख्यमंत्र्यांनी कुठलीही समज दिली नाही. माध्यमांत आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असे प्रतिउत्तरही अंबादास दानवे यांना दिले. 

काय म्हणाले संतोष बांगर

तिथे सीसीटीव्ही आहेत, काल मी आणि माझे कार्यकर्ते मंत्रालयात जात होतो. तेव्हा त्या पोलीस कर्मचाऱ्याने मला ओळखले नाही. तेव्हा माझ्या कार्यकर्त्याने त्यांना आमदार आहेत असे सांगितले. त्यानंतर त्या पोलिसाने जय महाराष्ट्र करत आम्हाला आत जाऊ दिले. जो पोलीस सकाळ ते संध्याकाळ तिथे ड्युटी करतो त्याच्याशी मी कोणताही वाद घातलेला नाही, असा खुलासा बांगर यांनी केला आहे. मला मुख्यमंत्री शिंदेंनी कोणतीही समज दिलेली नाहीय. आमदारांसोबत जे कार्यकर्ते असतात त्यांना आतमध्ये असेच जाऊ दिले जाते. पासेस विचारले जात नाहीत, कारण आमदार सोबत असतात. पासेस विचारले असते तर वाद झाला असता ना, असेही उत्तर बांगर यांनी दिले. 

टॅग्स :शिवसेनाआमदारमुंबईअंबादास दानवे