संजीव पुनाळेकर, विक्रम भावेवरील कारवाईला सात दिवसांत मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 02:13 AM2020-01-17T02:13:19+5:302020-01-17T02:13:38+5:30

सीबीआयने नोव्हेंबरमध्ये या दोघांवर दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्रानुसार, दाभोलकर यांची गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप असलेल्या शरद कळसकरला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकर यांनी दिला.

Sanjeev Punalekar approves Vikram Bhave's action within seven days | संजीव पुनाळेकर, विक्रम भावेवरील कारवाईला सात दिवसांत मंजुरी

संजीव पुनाळेकर, विक्रम भावेवरील कारवाईला सात दिवसांत मंजुरी

Next

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वकील संजीव पुनाळेकर व त्यांचा मदतनीस विक्रम भावे या दोघांवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायद्यांतर्गत (यूएपीए) कारवाई करण्याची परवानगी सात दिवसांत देऊ, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.

सीबीआयने नोव्हेंबरमध्ये या दोघांवर दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्रानुसार, दाभोलकर यांची गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप असलेल्या शरद कळसकरला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकर यांनी दिला. त्यांच्या सल्ल्यानुसारच कळसकर याने ठाणे येथील खाडी पुलावरून शस्त्राचे तुकडे करून फेकून दिले होते. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली होती. कळसकर व त्याचा सहआरोपी सचिन अंदुरे यांच्यावर यूएपीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुनाळेकर व भावे यांच्यावरही यूएपीएअंतर्गत कारवाई करण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळावी, याकरिता सीबीआयने गृह विभागाकडे १२ डिसेंबर रोजी अर्ज पाठविला. गेल्या सुनावणीत सरकारने १५ दिवसांत परवानगी देण्याचे मान्य केले होते. मात्र, अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. गुरुवारच्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी यांनी पुनाळेकर व भावेवर यूएपीएअंतर्गत कारवाई करण्याकरिता मंजुरी देण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत मागितली. सात दिवसांत मंजुरी देऊ, असे सरकारने म्हटले. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली.

दरम्यान, दाभोलकरांची हत्या करण्याकरिता वापरण्यात आलेले शस्त्र ठाणे खाडीतून शोधण्याकरिता सीबीआयने उच्च न्यायालयाकडून आणखी १५ दिवसांची मुदत मागितली न्यायालयाने मुदतवाढ देत या याचिकेवरील पुढील सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.

Web Title: Sanjeev Punalekar approves Vikram Bhave's action within seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.