Join us

बिहारींना हाकलणारे आज बिहारमध्ये जाऊन बैठकीला बसतायेत; संजय शिरसाट यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 14:51 IST

उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या या बैठकीला उपस्थिती दर्शवल्याने शिंदे गटाने निशाणा साधला आहे. 

बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक सुरु आहे. भाजपाविरोधातले १५ पक्ष या बैठकीसाठी एकत्र आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत देखील पाटण्यात दाखल झाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष बाकी आहे. त्यामुळं सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. भाजपविरोधात विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नितीशकुमार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून ते प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या या बैठकीला उपस्थिती दर्शवल्याने शिंदे गटाने निशाणा साधला आहे. 

एकीकडे बिहारींना हाकलणारे आज बिहारमध्ये जाऊन बैठकीला बसताहेत. हे झालेलं परिवर्तन पाहून मला धक्का बसला, असं शिंदे गटाचे आमदार संयज शिरसाट यांनी म्हटलं आहे. प्रत्येक राज्याची समस्या वेगवेगळी असते. तिथले राजकारण वेगळं असतं. प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगवेगळी आहे, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, दरम्यान, विरोधी पक्षांच्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे,  तामीळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआय महासचिव डी राजा, सीपीएम नेते सीताराम येचुरी आणि दीपांकर भट्टाचार्य सामील झाले आहेत. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनासंजय शिरसाट