Join us  

'त्या' गुंडाचा फोटो शेअर करणं राऊतांच्या अंगलट; शिंदे गटाचं जशास तसं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 8:38 AM

संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांसमवेतचे फोटो सोशल मीडियातून शेअर करत आहेत.

मुंबई - राजधानी मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. त्यातच, काही गुंड थेट मुख्यमंत्र्यांसोबत फोटोशूट करत असल्याचंही विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. 'हे सरकार चोरांची टोळी चालवत आहे, रोज गुंडाबरोबर बैठका सुरू आहेत. आम्ही अनेक मुख्यमंत्री पाहिले त्यांची लेखक, अभिनेते यांच्याशी भेट होत होती. पण आताचे मुख्यमंत्री गुंडांची भेट घेत आहेत. जे तुरुंगात असायला पाहिजेत ते आता मुख्यमंत्र्यासोबत दिसत आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सीएम एकनाथ शिंदे यांच्यावर केली. राऊतांच्या या टीकेला शिंदे गटानेही जशास तसं उत्तर दिलं आहे.  

संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांसमवेतचे फोटो सोशल मीडियातून शेअर करत आहेत. खासदार राऊत यांनी आणखी एक फोटो ट्विट करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. आतापर्यंत राऊतांनी सात फोटो ट्विट केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, पैचान कौन? मा. गृहमंत्री महोदय, हे लाल सिंग महोदय आहेत. खंडणी.. अपहरण..अशा सध्या किरकोळ ठरवल्या गेलेल्या गुन्हातील आरोपी. टीम मिंधे चे खास मेंबर. काय करणार तुम्ही? गुंडांनी गुंडासाठी चालवलेले राज्य, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. मात्र, आता शिवसेनेकडूनही राऊतांना जशास तसं उत्तर देण्यात येत आहे. 

शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी राऊत यांनी गुंड असा उल्लेख करत ज्या लाल सिंगचे फोटो शेअर केले. त्याच, लालसिंगचे फोटो माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासमवेतही आहेत. म्हात्रे यांनी हे फोटो शेअर करत राऊतांना सवाल केला आहे. 

पैचान कोण?, हे लाल सिंग महोदय आहेत. खरं तर हे उबाठामध्ये शाखाप्रमुख होते, याचा तुम्हाला विसर पडलेला दिसतोय. तुमच्या शब्दात, खंडणी.. अपहरण.. हे लाल सिंग यांच्यावरचे गुन्हे राजकीय परिस्थितीत झालेले आहेत, ते ही तुमच्या पक्षात. टोमणेसम्राट, आदूबाळाच्या टीमचे कधीकाळीचे खास मेंबर…आणि हे आहेत त्यांच्यासोबतचे खास फोटो… असे म्हणत शीतल म्हात्रे यांनी हे फोटो शेअर केले आहेत. तसेच, तुमच्यासारखा घोटाळेबाज आरोपी पण बाहेर मोकाट आहे… कधी तरी त्यावरही बोला...  मग ठरवा, नेमके गुंड कोण ? असा सवाल शिंदे गटाने राऊतांना विचारला आहे.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाएकनाथ शिंदे