Join us  

संजय राऊत यांची 'सूरत' बघण्यासारखी झालीय, आमदाराचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 10:47 AM

शिवसेनेकडून संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत रणनिती आणि पुढील दिशा सांगितली.

परभणी/मुंबई - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेते वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. नेहमीच शिवसेनेची भूमिका माध्यमांसमोर मांडणारे शिवसेना नेते संजय राऊत मंगळवारीही माध्यमांसमोर आले होते. त्यावेळी, त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि भाजप नेत्यांवर जबरी टिका केली. तसेच, सूरतमधील आमदार हे शिवसैनिक असून एकनाथ शिंदे आमचे जिवाभावाचे आहेत, असेही ते म्हणाले. राऊत यांनी शिवसेनेची सक्षमपणे बाजू मांडली. पण त्यांचा चेहरा सर्वकाही सांगता होता, त्यावरुनच भाजप आमदाराने राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.   

शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारल्यानंतर काल संपूर्ण दिवसभर मौन बाळगणारे एकनाथ शिंदे यांनी आज पहाटेपासून प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे आपल्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर भाजपाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्याबाबत शिंदे यांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. तत्पू्र्वी शिवसेनेकडून संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत रणनिती आणि पुढील दिशा सांगितली. तसेच, सूरतमध्ये असलेले हे सर्व आमदार परत येतील, आमदारांना जबरदस्तीने ठेवलं आहे, असेही ते म्हणाले. राऊत यांनी माध्यमांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांचा चेहरा काहीही पडलेला दिसला. यावरुनच भाजप आमदाराने राऊत यांना टोला लगावला आहे. 

परभणी जिल्ह्यातील सेलू-जिंतूर मतदारसंघातील महिला आमदार मेघना बोर्डीकर यांनी ट्विट करुन राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांची 'सुरत' बघण्यासारखी झाली आहे, असे ट्विट त्यांनी केलंय.

सर्व आमदार गुवाहटीला

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. "माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

सर्व आमदार स्वखुशीनं इथं आहेत- राज्यमंत्री बच्चू कडू

आमदारांना मारहाण करुन डांबून ठेवण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इथं असं अजिबात काहीच झालेलं नाही असं म्हटलं. "सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे", असं बच्चू कडू म्हणाले.  

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेआमदारपरभणी