Join us  

Sanjay Raut vs Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांनी इकडे तिकडे कडमडू तडमडू नये; संजय राऊतांची घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 5:14 PM

चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. यावरून संजय राऊतांना त्यांना प्रत्युत्तर दिलं.

Shivsena vs BJP: भाजपा सातत्याने महाविकास आघाडीवर टीका करते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलशिवसेना आणि इतर मित्रपक्षांवर टीका टिपण्णी करण्यात आघाडीवर असतात. याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर बोलताना, 'चंद्रकांत पाटील यांच्या चष्म्याचा नंबर मला चेक करावं लागेल. माझा त्यांना सल्ला आहे की त्यांनी येणाऱ्या निवडणुकांची तयारी करावी. इकडे तिकडे कडमडू तडमडू नये', असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.

"चंद्रकांत पाटील ज्या प्रकारची टीका करत असतात त्यावरून मला असं वाटतं की त्यांच्या डोळ्यांचा नंबर एकदा तपासून पाहायला हवा. राज्यातील नामवंत डॉ. लहाने यांना सांगून भाजपा कार्यालयात हेल्थ कँप लावायला हवा. त्यावेळी सगळ्यांचे डोळे तपासून घ्यायला हवे आणि त्यांना श्रवणयंत्रेही द्यायला हवी. शिवसेना अनेक ठिकाणी हेल्थ कँप भरवत असते. जर कोणाला गरज असेल तर आम्ही त्यांच्यावर तिथे उपचार करू", असा टोमणा संजय राऊत यांनी लगावला.

"संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याचा कारभार सर्वोत्तम प्रकारे सुरू आहे. हळूहळू सर्व संघटनांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसेल. चंद्रकांत पाटील हे अतिशय सज्जन गृहस्थ आहेत. ते निरागस, निष्पाप आणि निष्कपट आहेत. त्यांनी इकडे तिकडे कडमडू तडमडू नये. त्यांनी त्यांची प्रतिमा सांभाळावी आणि आगामी निवडणुकांच्या तयारीला लागावे", असंही रोखठोक मत राऊतांनी व्यक्त केलं.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की शत्रू जरी असला तरी आपण त्याच्या तब्येतीबद्दल त्याला शुभेच्छा देतो. उद्धव ठाकरे आमचे मित्र आहेत. पंतप्रधानांनी कोरोनाविषयी घेतलेल्या बैठकीला ते गैरहजर राहिले. त्यांची प्रकृती बरी नसेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवायला हवा. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानंतर आज राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :संजय राऊतचंद्रकांत पाटीलउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा