Sanjay Raut News: राज्यातील महायुती सरकारने गेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची प्रचंड चर्चाही झाली. विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. महायुतीने आश्वासन दिल्यानुसार लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी मिळणार, अशी विचारणा सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या योजनेवरून महायुती सरकारवर टीका केली आहे.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. या दोन्ही विभागांचे अनुक्रमे ४१० कोटी ३० लाख आणि ३३५ कोटी ७० लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळविण्यात आले आहेत. महिला आणि बालविकास विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केल्याचे समजते. यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही म्हटले होते. यानंतर संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.
१५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते
लाडकी बहीण योजना आता बंद झालेली आहे. आता ५०० रुपये देत आहेत. १५०० वरून ५०० वर आले. प्रचारात २१०० रुपये देणार असल्याचे म्हणाले होते. अजित पवार आता सांगत आहेत की, मी नाही बोललो, कर्जमाफी मी कुठे बोललो. मात्र सरकार तुमचे आहे, तुम्ही त्या सरकारमध्ये आहात. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. आता प्रत्येक मंत्री बोलत आहे माझा पैसा, माझा पैसा. यात तुमचा पैसा कुठला? एक मंत्री आहेत माझ्या खात्याचा पैसा वळवला आणि लाडक्या बहिणींना दिला, असे सांगत आहे. परंतु, तुम्हाला कशाला पाहिजे पैसा?, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.
दरम्यान, लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे दिले म्हणून तुम्ही रडत आहात. आधी कसे हसत होतात, मत पाहिजे म्हणून. खिशातला पैसा वळवला का सरकारी पैसा आहे, याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींना फसवत आहात. तुमचे सामाजिक विभागाचे जे कार्य आहे त्याची फसवणूक करत आहे. चोऱ्यामाऱ्या लांड्यालबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकीट मारी केली होती आणि आता ही पाकीट मारी करणे सोपे नाही. अजित दादा तिकडे बसलेले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.