Join us

“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 13:58 IST

Sanjay Raut News: इंदिरा गांधींचा इतिहास पाहा. बदला म्हणजे कोणता बदला घेतला, अशी विचारणा संजय राऊतांनी करत केंद्र सरकारवर टीका केली.

Sanjay Raut News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २७ लोक मारले गेल्यावर बदला कसा असायला हवा. इंदिरा गांधींचा इतिहास पाहा. त्यांना नेहरु इंदिरा गांधींचा त्रास होतो. बदला म्हणजे कोणता बदला घेतला, कोणाला मूर्ख बनवत आहेत, पंतप्रधान दौरे करतात, इथून-तिथून लोकांना मिठ्या मारत फिरतात, लोकांना मूर्ख बनवतात. काहीही बदला घेतलेला नाही. शांतपणे आनंदात, सुखाने चालले आहे. मला आता या देशाची भीती वाटते, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने केंद्र सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने दहशतवाद्यांना पोसणाऱ्या व आपल्या भूमीतून घातपाती कारवाया करणाऱ्या पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारच्या वस्तू आयात करण्यावर भारताने तत्काळ संपूर्ण बंदी लागू केली. पाकिस्तानबरोबर हवाई व जमीन मार्गाने सर्व प्रकारच्या टपाल व पार्सल देवाणघेवाण सेवा स्थगित केल्या. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसेच काही युट्युब चॅनलही बंद करण्यात आले आहेत. यावरूनच संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?

हे अशाप्रकारचे राज्यकर्ते जर देशात असतील आणि शत्रू जर इतका समोर माजलेला असेल, तर आमची बदल्याची पद्धत काय तर युट्यूब बंद करायचे आणि नाड्या आवळायच्या हे बंद करा. हे फक्त भाजपाच्या विरोधकांना चुन चुन के मारण्याचा प्रयत्न करतात. तेही आता शक्य नाही. आता युद्ध सराव करत आहेत. पहलगाम हल्ल्याला १२ दिवस होऊन गेले आहेत. याचा बदला काय घेतला, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या सोडल्या, पाकिस्तानचे २१ युट्यूब चॅनल बंद केले. पाकिस्तानच्या हाय कमिशनमधील कर्मचारी वर्ग कमी केला, याला बदला घेणे म्हणतात का? तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्यांचे पक्ष फोडून टाकता, त्यांना तुरुंगात टाकता. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करता. बदला घेता ना, आपल्यासमोर आपला कोणताही राजकीय शत्रू नको. संपवून टाकायचे. मग पाकिस्तानच्या बाबतीत एअरस्पेस बंद केली, युट्यूब चॅनल बंद केले, याला बदला घेणे म्हणतात का? अशी विचारणा संजय राऊतांनी केली. 

दरम्यान, नव्या आदेशानुसार इतर देशांतून वळवून भारतात येणाऱ्या पाकिस्तानी वस्तूंच्या आयातीवरही पूर्णपणे बंदी घातली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शनिवारी पाकिस्तानबरोबर हवाई आणि जमीन मार्गाने सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सल देवाणघेवाण सेवा स्थगित केल्या. सेवा स्थगित करण्याचा आदेश दळणवळण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या टपाल विभागाने जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च संरक्षण अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितले की, दहशतवादी हल्ल्याला भारताच्या प्रत्युत्तराची पद्धत, लक्ष्य व वेळ ठरवण्याचे 'पूर्ण अंमलबजावणी स्वातंत्र्य' सशस्त्र दलांना आहे.

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनापहलगाम दहशतवादी हल्लाजम्मू-काश्मीरकेंद्र सरकार