Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला. राजनाथ सिंह हे राष्ट्रीय पातळीवर बोलत आहेत. मात्र, आमच्यासारख्या लोकांनी हुकूमशाही विरुद्ध लढण्याची ठाम भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले.
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला. अर्ज दाखल करताना शरद पवार आणि शिवसेनेतर्फे मी उपस्थित होतो. एक दिवस आधी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात बी. सुदर्शन रेड्डी यांचे स्वागत करणाऱ्या आणि पाठिंबा व्यक्त करणाऱ्या विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यात मी आणि शरद पवार उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे, असे मी तेव्हाच सांगितले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
डुप्लिकेट शिवसेनेची मते फुटतील ही भीती आहे का?
बाळासाहेब ठाकरे यांना पक्ष तुम्ही फोडला. शरद पवारांचा पक्ष फोडला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी आमदार, खासदार पन्नास-पन्नास कोटीला विकत घेतले. तुम्ही त्याच पक्षाकडे मत मागत आहात, याचे मला आश्चर्य वाटते. आपल्याकडे बहुमत आहे असे आपण म्हणतात तर तुम्हाला अशा प्रकारे मत मागण्याची गरज नाही. तुम्हाला आमच्याकडे मते मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्हाला भीती वाटते का की तुमचे मते फुटतील. डुप्लिकेट शिवसेनेची मतं फुटतील ही भीती आहे का? अशी विचारणा संजय राऊतांनी केली.
दरम्यान, आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्यगिरी शिकवू नये. ते महाराष्ट्राचे मतदार आहेत. मग त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे होते. देवेंद्र फडणवीस तुम्ही आम्हाला काही सांगू नये. तुम्ही एखादा मराठी माणूस उमेदवार म्हणून दिला असता तर त्यावर चर्चा झाली होऊ शकली असती. पण आता नाही. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सहज नाही. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना आणि आम्ही एनडीएमध्ये असताना मराठी भूमिकन्या म्हणून त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. आंध्र आणि तेलंगणाचे खासदार अशा प्रकारची काही भूमिका घेतील का? अशी भीती या लोकांना वाटत आहे. राहुल गांधी यांनी जे वातावरण देशात निर्माण केलेले आहे. त्यानंतर क्रॉस वोटिंग व्हायची शक्यता आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.