Join us

Sanjay Raut Interview: मुंबई पालिका निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात? संजय राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 15:37 IST

आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीचं नेतृत्त्वं केलं तर नक्कीच आम्ही त्यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक जिंकू असा ठाम विश्वास देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. 

Sanjay Raut Interview: मुंबई महापालिकाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेवर यंदा भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून मुंबईत जनआशीर्वाद यात्रेत वारंवार करण्यात आला. त्यामुळे राणेंचं टार्गेट मुंबई महापालिका निवडणूक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात आगामी मुंबई पालिका निवडणूक शिवसेनेनं आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात लढण्याची तयारी सुरू केल्याचीही माहिती समोर आली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही सहमती दर्शवली आहे. 

'मुख्यमंत्र्यांपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद'; संजय राऊत यांचं मत 

"आमची पिढी जी इतके वर्ष काम करत आलीय. तर आम्हालाही वाटतं की तरुण पिढीनं नेतृत्त्व करायला हवं. आमच्याशिवाय कुणी नाही पक्षात या भूमिकेत आम्ही कधीच नसतो. किंबहुना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष हा सतत पुढल्या पिढीनं हा पुढे पुढे नेत राहिला पाहिजे. यादृष्टीनं आदित्य ठाकरेंचं नेतृत्व या महानगर पालिका निवडणुकीत लाभलं तर माझ्यासाठी ती आनंदाचीच गोष्ट ठरेल. त्यांचं नेतृत्त्व झळाळून निघालं तर सगळ्यात जास्त आनंदी मी असेन", असं संजय राऊत म्हणाले. 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत संजय राऊत यांनी हे विधान केलं आहे. 

आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीचं नेतृत्त्वं केलं तर नक्कीच आम्ही त्यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक जिंकू असा ठाम विश्वास देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. 

मुख्यमंत्रीपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पदपक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये नेमकं कोण वरचढ दिसतंय? असं संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद असल्याचं विधान केलं आहे. "मी नेहमी पक्ष प्रमुखांना वरचढ मानतो. ते मुख्यमंत्री आहेत हा योगायोग आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख हे आजही सर्वोच्च पद आहे. जसं बाळासाहेब म्हणायचे की शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च पद आहे. तसं आजही मी मानतो की शिवसेना पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

शिवसेनेवर टीका करणं हाच राणेंचा 'सूक्ष्म' उद्योग आहे का?नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. भाजपानं त्यांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी ओळखून त्यांनी खात्याचं काम करावं. त्यांना शिवसेनेवर टीका करण्याचा 'सूक्ष्म' उद्योग करण्यासाठी केंद्रीय मंत्री केलंय का? राणेंचं ते काम नाही. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचं काम पाहावं, असा सल्ला संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे. 

टॅग्स :संजय राऊतआदित्य ठाकरेमुंबई महानगरपालिका