Join us  

Lakhimpur Kheri Incident: “राहुल गांधी म्हणतात, तृणमूल व आप मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देतात”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 11:16 AM

Lakhimpur Kheri Incident: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची दिल्लीत भेट घेतली होती.

ठळक मुद्दे‘खुलकर’ कोणीच लढत नाहीतृणमूल काँग्रेस व आम आदमी पक्ष काँग्रेसला गिळत आहेगोव्यात तृणमूल व आप आले आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले

मुंबई: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी हिंसाचाराला अनेक दिवस झाले असले, तरी या घटनेच्या (Lakhimpur Kheri Incident) तीव्रतेमुळे अजूनही यावरून देशातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीचा वृत्तांत संजय राऊत यांनी सामनामधील आपल्या रोखठोक सदरात दिला आहे. तृणमूल व आप मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देतात, असे राहुल गांधी यांना वाटते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत. गोव्यात काही संबंध नसता तृणमूल काँग्रेस व आम आदमी पक्ष आला आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात, अशी खंत राहुल गांधी यांनी बोलून दाखवल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

तृणमूल व आप काँग्रेसला गिळत आहे

तृणमूल काँग्रेस व आम आदमी पक्ष काँग्रेसला गिळत आहे. त्यांनी भाजपचे निदान शेपूट तरी तोडावे. काँग्रेस कमजोर करणे व त्यातून स्वतः वाढणे हे शेवटी भारतीय जनता पक्षालाच सोयीचे ठरते. ममता बॅनर्जी यांनी बंगाल जिंकले, पण संपूर्ण देशात त्यांना स्वीकारार्हता नाही व अरविंद केजरीवाल हे केंद्रशासित दिल्लीचेच मांडलिक राजे. हे कोणीच समजून घ्यायला तयार नाही. या सगळ्यांना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी नकोत. कारण देशाचे नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मोदी व शहांचेही तेच मत आहे. विरोधकांची एकजूट होऊ नये व काँग्रेस कमजोरच राहावी, हे भाजपला वाटणे व इतर विरोधकांनाही तेच वाटणे यात फरक आहे, असे संजय राऊत यांनी या सदरात म्हटले आहे. 

तो दिवस लवकर उजाडो हीच अपेक्षा

उत्तर प्रदेशातील सर्वच राजकारणी हातचे राखून लढायला उतरले आहेत. प्रत्येकाचे हात कुठेतरी दगडाखाली अडकले आहेत. त्यामुळे ‘खुलकर’ कोणीच लढत नाही. गांधी यांचा रोख बहुधा मायावतींवर असावा. उत्तर प्रदेशसारखे मोठे राज्य जाती-धर्मात विभागले आहे. त्यामुळेच भाजपचा फायदा होतो, पण एक वेळ अशी येईल काँग्रेसच भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी हे म्हणाले, तो दिवस लवकर उजाडो हीच अपेक्षा, असे म्हणत या लोकांनी देशात काय चालवले आहे पाहा, अशीच सुरुवात राहुल गांधींनी केली. यह लोक लोकतंत्र को पुरी तरह से खतम करने जा रहे है। लेकीन हम लढेंगे!, असेही राहुल गांधींनी म्हटल्याचे संजय राऊत यांनी आपल्या सदरात नमूद केले आहे. 

आणखी वाचा: “प्रियांका गांधींमध्ये थेट माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते”: संजय राऊत

टॅग्स :लखीमपूर खीरी हिंसाचारराजकारणसंजय राऊतराहुल गांधी