Sanjay Raut News: काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रात आले. त्याबाबत त्यांचे आभार मानतो. राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रात काय सुरु आहे, हे देश पातळीवर पसरले आहे. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस कोठडीत हत्या झाली. राहुल गांधी बरोबर बोलले आहेत. ती हत्याच आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. त्यांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी सरकारची होती. ज्यांनी या हत्या घडवल्या त्यांना आपण पाठीशी घालत आहात, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
परभणीतील तरुण सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता. तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे. सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे. ज्यांनी ही हत्या केली त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचे सांगत तेही याप्रकरणी तितकेच जबाबदार आहेत असे म्हटले. आरएसएसची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची असून या भेटीत कोणतेही राजकारण करणार नाही. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असे राहुल गांधी यांनी कुटुंबाला दिलेल्या भेटीनंतर म्हटले होते. यावरून आता संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
गृहमंत्री म्हणून तुम्ही बीडला गेलात का?
महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे. परभणी, बीडमधल्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला काळिमा लावला आहे. या घटनांशी संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्याशी संबंधित लोक तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आपण न्यायाच्या गोष्टी करत आहात, द्वेषाच्या गोष्टी करत आहात. आपण स्वतः एकदा बीडला जा. गृहमंत्री म्हणून आपण बीडला गेलात का? राहुल गांधी परभणीला गेले यामुळे आपले पित्त का खवळले? राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत. भारतीय संविधानाने त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलेला आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी नाही. पंतप्रधान मोदी यांच्याकडे बहुमत नाही, ते कुबड्यांवर आहेत. आपण गृहमंत्री म्हणून परभणीत जायला पाहिजे होते. पण आपल्याला भीती वाटते. आपण तिथे गेला तर सैन्य घेऊन जाल, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरण दडपण्याचे पाप सरकार करत आहे. सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले पण आम्ही वस्तुस्थिती जाणून घेतली आहे, सोमनाथ सुर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सांगितले आहे. सोमनाथ सुर्यवंशी व संतोष देशमुख प्रकरणी अधिवेशनात प्रश्न मांडला पण मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. काँग्रेस यासंदर्भात मुख्यमंत्र्यांविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणेल. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्याऱ्यांना सोडणार नाही. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक समाजावर भाजपा सरकार अत्याचार करत आहे. काँग्रेस या अत्याचाराविरोधात आवाज उठवून पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे काम करेल, अशी टीका नाना पटोलेंनी केली.