Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रदेशाध्यपदी संजय पांडे; बावनकुळेंनी दिलं नियुक्तीपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 18:48 IST

संघटनेच्या माध्यमातून हा समाज एकत्रित भाजपाच्या पाठी उभा राहील हे आव्हान आम्ही पेलू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपाने उत्तर भारतीय मोर्चाची कमान पुन्हा संजय पांडे यांच्याकडे दिली आहे. मुंबईतील निवडणुकीत उत्तर भारतीय मतांची संख्या लक्षात घेऊन भाजपाकडून पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रदेश कार्यालयात संजय पांडे यांच्या नियुक्तीची घोषणा करत त्यांना नियुक्ती पत्र दिले.

मुंबई महापालिका निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केलीय. मुंबईत मराठीसोबत उत्तर भारतीय मतदारांची लक्षणीय संख्या आहे. त्यामुळे भाजपाने उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी संजय पांडे यांच्यावर सोपवली आहे. संजय पांडे यांना दुसऱ्यांना पक्षाने ही संधी दिली आहे.

या नियुक्तीनंतर संजय पांडे म्हणाले की, भाजपा महाराष्ट्रने माझ्यावर पुन्हा सोपविलेली उत्तर भारतीय मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मला नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दर्शवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्याचसोबत महाराष्ट्रात दुधात साखर असल्याप्रमाणे उत्तर भारतीय समाज राहत आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यात विविध ठिकाणी उत्तर भारतीय समाज आहे. जे पिढ्यानपिढ्या इथे राहतोय. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमच्या पूर्वजांनी मेहनत केली, त्यांचाही वाटा आहे हे कुणी नाकारू शकत नाही. संघटनेच्या माध्यमातून हा समाज एकत्रित भाजपाच्या पाठी उभा राहील हे आव्हान आम्ही पेलू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजय पांडे हे मुंबईतले असून मुंबईत उत्तर भारतीय मतदारांची ताकद पाहता त्यांच्या फेरनिवडीला विशेष महत्त्व आहे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यात केवळ मुंबईतच नव्हे तर पुणे, नाशिक, नागपूर याठिकाणीही उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यामुळे या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने ही निवड तात्काळ लागू केली आहे.

 

टॅग्स :भाजपा