Join us  

Avani Tigress : सुधीर मुनगंटीवार शिकारी माफियासोबत पैसे कमवत आहेत, गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 12:55 PM

अवनी वाघीण हत्या प्रकरणाचं राजकारण सध्या जोरात सुरू आहे. अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल चढवला जात आहेत.

ठळक मुद्दे'शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांशी मुनगंटीवारांचे साटेलोटे'मुनगंटीवारांविरोधात कारवाई व्हावी - निरुपम'मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याची संख्या वाढली'

मुंबई - अवनी वाघीण हत्या प्रकरणाचं राजकारण सध्या जोरात सुरू आहे. अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल चढवला जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याची संख्या वाढली आहे, असा आरोप निरुपम यांनी केला आहे. 

पत्रकार परिषद घेऊन संजय निरुपम यांनी मुनगंटीवार यांच्यावर हल्लाबोल चढवला. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. अवनी वाघीण हत्या प्रकरणी मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून हटवून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. शिवाय, मुनगंटीवार हे आंतरराष्ट्रीय शिकारी माफियासोबत आहेत, त्याच्यासोबत ते पैसे कमवत आहेत, असा गंभीर आरोपदेखील निरुपम यांनी केला आहे.दरम्यान, निरूपम यांच्या आरोपांवर मुनगंटीवार काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.  

राज्यात भाजपाचे सत्तेत येताच 2015 मध्ये 14 वाघांचा मृत्यू झाला. 2016 मध्ये 16 आणि 2017मध्ये तब्बल 21 वाघांचा मृत्यू झाला. यात काही वाघांचा नैसर्गिक मृत्यूही झाला असावा. पण वाघांना ठार मारल्याच्या घटना पाहता सुधीर मुनगंटीवार हे शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीत सामील असावेत, असे विधान निरुपम यांनी केले आहे.  

(भाजपाला सत्तेचा माज आलाय,अवनी वाघिणीच्या शिकारीवरुन राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा)

दुसरीकडे, अवनी वाघीण हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे. अवनीला वाघिणीच्या प्रकरणात मुनगंटीवारांचा राजीनामा मागणं चुकीचं आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांची पाठराखण केली. तसेच वाघिणीच्या प्रकरणात मनेका गांधींची भेट घेणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. 

...म्हणून अवनी वाघिणीला केले ठार

टी-1 वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या 47 दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर 2 नोव्हेंबरच्या रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं तिला ठार केलं. या वाघिणीनं गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. तिनं13 जणांचा जीव घेतला होता. अवनीच्या मृत्यूनंतर वन्यजीव प्रेमींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शुक्रवारी टी-1 वाघिणीचा शोध सुरू होता. त्यावेळी ती शोध पथकाला दिसली. तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यावेळी तिनं पथकाच्या दिशेनं चाल केली. त्यामुळे शार्प शूटर अजगर अलीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा मृत्यू झाला. 

टॅग्स :संजय निरुपमअवनी वाघीणसुधीर मुनगंटीवारभाजपा