Join us  

“काँग्रेस स्वत:च्या नेत्यांना न्याय देऊ शकत नाही, जनतेला काय देणार?”; संजय निरुपम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 3:10 PM

Sanjay Nirupam News: लोकसभा निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच ३०० पेक्षा कमी जागा लढवणाऱ्या काँग्रेसचे तथाकथिक हायकमांड हतबल झालेत, अशी टीका संजय निरुपम यांनी केली.

Sanjay Nirupam News: एकीकडे लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी अधिक आव्हानात्मक असल्याचे पाहायला मिळत आहे. तर विविध कारणांवरून काँग्रेसमधील नेते पक्षाला घरचा आहेर देताना दिसत आहेत. पक्ष नेतृत्वावर टीका केल्याप्रकरणी मुंबईतील काँग्रेस नेते संजय निरुपम यांची अलीकडेच सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर संजय निरुपम यांनी ठाकरे गटावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले.

मी आधी राजीनामा दिला, मग पक्षाने माझ्यावर कारवाई केली, असा दावा संजय निरुपम यांनी केला होता. संजय निरुपम यांनी खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. मुंबईसह काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू होती. ठाकरे गटाच्या थेट भूमिकेमुळे काँग्रेसमधील अनेक नेते नाराज होते. अशा नेत्यांनी त्यांची तक्रार काँग्रेसच्या हायकमांडकडे मांडली होती. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नसल्याचे पाहायला मिळाले. हाच धागा पकडून संजय निरुपम यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. एक्सवर एक पोस्ट शेअर करत संजय निरुपम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

काँग्रेस स्वत:च्या नेत्यांना न्याय देऊ शकत नाही, जनतेला काय देणार?

काँग्रेसचे तथाकथिक हायकमांड इतके हतबल झालेत की, शिवसेनेमुळे त्रस्त झालेले मुंबई काँग्रेसचे नेते जेव्हा दिल्लीला व्यथा मांडण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना उलट्या पावली माघारी पाठवण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच ३०० पेक्षा कमी जागा लढवणारी काँग्रेस जेव्हा आपल्याच नेत्यांना न्याय देऊ शकत नाही, तेव्हा जनतेला काय न्याय देणार? यावरून इंडिया आघाडी वास्तवात कसे काम करत आहे याचा अंदाज लावा, असे संजय निरुपम यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, राजकारणात कधीही कुटुंबाला खेचू नये. पण घोटाळा ज्याप्रकारे झाला, त्यात त्यांचा उल्लेख करावा लागत आहे. संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पकडले गेल्यानंतर पत्नीच्या नावे लाच घेतल्याचे समोर आले होते. पत्नीला मधे आणायला नको होते. खिचडी घोटाळ्यात मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत, असा आरोप संजय निरुपम यांनी केला होता. 

टॅग्स :संजय निरुपमलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४